नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) सहाव्या टप्प्यात उद्या शनिवारी 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांवर मतदान होणार आहे. या मतदारसंघात शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या. दिल्लीतील सर्व 7 जागा, हरियाणातील सर्व 10 जागा आणि उत्तर प्रदेशातील 14 जागांचा यामध्ये समावेश आहे. या टप्प्यानंतर देशात आणखी सातव्या टप्प्यात मतदान बाकी आहे. त्यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.
सहाव्या टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक महत्त्वाचे नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये मनोज तिवारी, मनेका गांधी, नवीन जिंदाल, बन्सुरी स्वराज, संबित पात्रा, कन्हैया कुमार, जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुक्ती, राज बब्बर, निरहुआ हेही रिंगणात आहेत. निवडणुकीच्या या टप्प्यात भाजप तसेच काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांनी दावे केले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सहाव्या टप्प्यात 889 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये 797 पुरुष आणि 92 महिला उमेदवार आहेत. लोकसभेच्या 543 जागांपैकी पाचव्या टप्प्यापर्यंत 429 जागांवर मतदान झाले आहे. 25 मे पर्यंत एकूण 487 जागांवर मतदान पूर्ण होईल. शेवटच्या आणि सातव्या टप्प्यात 56 जागांवर मतदान होणार आहे.