शंकर जाधव, डोंबिवली
डोंबिवलीतील एमआयडीसी (Dombivli Blast) येथील अमुदान या रसायन कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 65 हून अधिक कामगार गंभीर रित्या जखमी झाले आहेत. काल रात्री उशीरापर्यंत एनडीआरएफच्या (Midc) टीमकडून येथे शोधमोहिम राबवण्यात येत होती. आज शुक्रवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे अमुदान या कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबाना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली आगीच्या घटनेवर शोक व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
NDRF च्या टीमकडून शुक्रवार सकाळापासून पुन्हा शोधमोहिम सुरू करण्यात आली. पाच गाड्या तेथे दाखल झाल्या असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 11जणांना जीव गमवावा लागला आहे. काल रात्रीपर्यंतचा आकडा हा 8 होता मात्र आज सकाळपासून आणखी तीन मृतदेह दुर्घटनास्थळी असलेल्या ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आता 11 वर पोहोचली असून आणखी बरेच ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.