NCP Meeting : राष्ट्रवादीची २७ मे रोजी मुंबईत बैठक
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील टप्पे संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार तत्काळ पक्षाच्या संघटनात्मक कामाला लागले आहेत. २७ मे रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक (NCP Meeting) गरवारे क्लब हाऊस पार पडत आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक चर्चा केली जाणार आहे.
NCP Meeting : मतदान पक्षासाठी कितपत अनुकूल
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने लोकसभेची निवडणूक भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्या सोबत महायुतीच्या माध्यमातून लढवली. रायगड, बारामती, शिरूर, धाराशिव या लोकसभेच्या चार जागा पक्षाच्या घड्याळ चिन्हावर लढविल्या. परभणीची जागा अजित पवार यांच्या पक्षाच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना देण्यात आली. नाशिक लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार गट आग्रही होता. राष्ट्रवादीलाच ही जागा मिळणार, असे चित्र असताना या जागेबाबत घोळ झाला. महायुतीत ही जागा शिंदे गटाला देण्यात आली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने लढवलेल्या मतदारसंघात किती मतदान झाले, ते मतदान पक्षासाठी किती अनुकूल आहे, यावर या बैठकीत चर्चा होईल, असे समजते.
हेही वाचा : उमेश पाटलांचा रोहित पवारांवर गंभीर आरोप
NCP Meeting : विधानसभेसाठी सावधगिरी
विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा झालेला घोळ विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून त्याची आतापासून तयारी पक्षाने सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा सप्टेंबर महिन्यात होईल. विधानसभा निवडणुकीची तयारी आणि या कालावधीत हाती घ्यायचे कार्यक्रम यावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या या बैठकीला पक्षाचे मंत्री, आजी, माजी खासदार, आमदार, २०२४ चे लोकसभा उमेदवार, प्रदेश पदाधिकारी उपस्थित असतील. शिवाय विविध आघाड्यांचे राज्य प्रमुख, प्रवक्ते, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला आणि युवक आघाडी जिल्हाध्यक्ष, युवती विभागीय अध्यक्ष, समन्वयक आणि मुंबई विभागीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.