संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सांगली मतदारसंघात (Sangli Loksabha) 7 मे रोजी मतदान पार पडलं. सांगली मतदारसंघ अनेक राजकीय घडामोडींमुळे चर्चेतच आलायं. त्याचं कारण म्हणजे वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरीचं हत्यार उपसलंय. कारण महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटलांना (Chandrahar Patil) उमदेवारी देण्यात आलीयं. तर मागील दोनवेळी निवडून आलेले महायुतीचे खासदार संजय काका पाटील (Sanjay Kaka Patil) हेच रिंगणात उतरले आहेत. विशाल पाटलांच्या बंडखोरीने यंदाचीही निवडणूक तिरंगीच होणार आहे. मागील निवडणुकीतही भाजपला तिरंगली लढतीचा फायदा झाल्याने संजय काका पाटील यांनी गड राखला होता. यंदाही तिरंगी लढत होणार आहे, त्यामुळे सांगलीचा आखाडा नेमका कोण मारणार? हे येत्या 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये सांगली, मिरज,पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जतचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघात एकूण 58 टक्के मतदान झालंय. मिरज तालुक्यात, 59 टक्के तर सांगलीमध्ये 57.50, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये 61.16 तर जत तालुक्यात 59.32 तसेच खानापूरमध्ये 51.11, पलूस-कडेगाव 56.45 टक्के मतदान झालंय.
Sangli Loksabha संजयकाकांचे विरोधक अन् योगींची सभा
मागील दोन टर्म खासदार राहिलेले संजय काका पाटील यांचे दहा वर्षांच्या काळात विविध तालुक्यातील समर्थक आता विरोधक झाल्याचं दिसून येत आहे. जत तालुक्यात जगताप तर पळूस-कडेगावमध्ये देशमुख यांच्यासोबत त्यांचं फिस्कटल्याचं सांगण्यात येत आहे. या तालुक्यांमध्ये जगताप आणि देशमुख घराण्यांचा अधिक वरदहस्त आहे. त्यामुळे दोन तालुक्यातून संजय काकांना यावेळी फटका बसण्याची शक्यता आहे. सलग तिसऱ्यांना बाजी मारण्यासाठी संजय काका पाटलांनी चांगलीच रणनीती आखल्याचं दिसून आलं होतं. सांगली-मिरज भागातून हिंदुत्वाच्या नावावर मोठं मताधिक्य मिळवण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचं आयोजन केलं होतं. एकीकडे धार्मिक ध्रुवीकरणामुळे विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांची मते विखुरले जातील आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते पदरात पाडून घेण्याचा रणनिती संजय काका पाटलांनी आखली होती.
PM मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याची सर्वत्र चर्चा
Sangli Loksabha चंद्रहार पाटील तुल्यबळात कमी
सांगली मतदारसंघात वसंतदादा पाटील घराण्याला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यात वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारुन चंद्रहार पाटील यांना उमेदवार जाहीर केल्याने वसंतदादा गटाकडून संतापाची लाट उसळली. त्यातच चंद्रहार पाटील यांचं वरदहस्त विशाल पाटलांपेक्षा कमी असल्याचं बोललं जात आहे. डबल महाराष्ट्र केसरी म्हणून त्यांनी राज्यात जरी वेगळी ओळख निर्माण केली असली तरीही सांगलीकरांच्या मनात दादा घराण्याविषयी नेहमीच आदर असल्याचं सांगितलं जातंय. त्यात संजय पाटील आणि विशाल पाटील हे भाजपचेच उमेदवार असून तिरंगी लढतीमध्ये चंद्रहार पाटलांनाच पसंत देण्याबाबतचं आवाहन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं होतं. सांगली मतदारसंघात मुस्लिम आणि दलित मतदारांचीही मोठी संख्या आहे. ही मते विशाल पाटील आणि काँग्रेससोबत जोडलेली आहेत. त्याचा फटका दोन्ही उमेदवारांना बसण्याची शक्यता असून मते विखुरल्याचा संजय काका पाटलांनाच फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.
Sangli Loksabha उमेदवारी नाकारल्याने ‘वसंतदादा’ गट एकवटला…
सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, अचानकपणे उमेदवारी नाकारल्याने संतापाची लाट उसळून आली. वसंतदादा घराण्याच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाल्याने सांगलीतील मदन पाटील गट, विशाल पाटील, प्रतिक पाटील, कदम गट, एकत्र आल्याचं दिसून आलं. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदमांनी विशाल पाटलांच्या उमेदवारीची मागणी लावूनच धरली. राष्ट्रवादीमुळे उमेदवारी मिळत नसल्याचा आरोप होत होता. अशातच वसंतदादांना मानणारा जुना मतदार एकवटत विशाल पाटलांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तर जत तालुक्यातील धनगर नेत्यांनीही विशाल पाटलांना पाठिंबा दिल्याने त्यांना धनगर मतांचा मोठा फायदा होणार आहे. यासोबतच संरपंचांपासून ते नगरसेवकांपर्यंत सर्वांनीच विशाल पाटलांनाच पसंत दिली असल्याचं चित्र दिसून येत आहे.