काल रविवारी (19 मे) मान्सून (Monsoon) अंदमानात दाखल झाला आहे. आता 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अंदमानमध्ये मान्सून दाखल होताच वातावरण बदललं आहे. आज 20 मे रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. सध्या अंदमानमध्ये पाऊस सुरू झाला आहे. त्याचबरोबर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. आज (दि. 20) आणि उद्या (21 मे) रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Monsoon पुढील दोन दिवस पावसाचा इशारा
हवामान तज्ज्ञ केएस होसलीकर यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. आयएमडीने नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत तुफान पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
Monsoon मान्सून दहा दिवसांत केरळला पोहोचेल
हवामान खात्याने जसा अंदाज दिला होता, तसा मान्सून काल अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला आहे. आता त्याची वाटचाल केरळच्या दिशेने सुरू होणार आहे. साधारणता: अंदमानमधून येणारे नैऋत्य मोसमी वारे केरळपर्यंत पोहोचायला 10 दिवस लागतात. दरम्यान, मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर मान्सून ३१ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल.