मुंबई
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आणि शेवटच्या टप्प्यात सोमवारी 13 मतदारसंघात मतदान (Election) होणार आहे. त्यात मुंबई – ठाणे – नाशिक मधील जागांचा समावेश आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुंबईत लोकसभेच्या सहा जागा असून मुंबईकर कुणाच्या पदरात मतांचे दान टाकायहेत हे सोमवारी ठरणार आहे. पाचव्या टप्प्यात केंद्रीय मंत्री पियूष गोयल, कपिल पाटील, भारती पवार यांच्यासह वर्षा गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे अशा दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे.
लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात 48 मतदार संघात पाच टप्प्यात विभागली गेली होती. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान होत आहे. आणखी दोन टप्पे उरले असून त्यात अन्य राज्यातील 114 मतदारसंघाचा समावेश आहे. 1 जूनला शेवटव्हे मतदान आहे. 4 जूनला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे निकालाची प्रतीक्षा असणार आहे. पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा, ठाण्यातील तीन, नाशिकमधील दोन मतदारसंघासह पालघर व धुळे मतदारसंघात मतदान होणार आहे. विशेष म्हणजे 2019 ला या सर्व जागा शिवसेना भाजपा युतीने जिंकल्या होत्या. यावेळी मात्र राजकीय उलथापालथीमुळे या सर्व मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे.
भाजपशी शिवसेनेने फारकत घेतल्यानंतर महाराष्ट्रात 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली. त्यांनतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली. या फुटीमुळे राज्याच्या राजकारणाचा चेहरामोहराच बदलून गेला. मात्र शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने उर्वरित शक्ती एकवटून भाजपा, शिंदे सेना व अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या महायुतीला आव्हान दिले होते. एकवटलेले विरोधक, तोडफोडीचा राजकारणामुळे लोकांमध्ये असलेली नाराजी, मराठा आरक्षणामुळे बदललेले सामाजिक समीकरण, संविधान बदलाच्या चर्चेमुळे निर्माण झालेली अस्वस्थता आदी मुद्द्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी महाराष्ट्राची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. 2019 ला भाजपा शिवसेना युतीला 48 पैकी 41 जागा मिळाल्या होत्या. यावेळी मोठी पिछेहाट होऊ नये यासाठी भाजपाने आपली सगळी ताकद महाराष्ट्रात पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात तब्बल 25 सभा घेतल्या. मुंबईत रोड शो ही केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्वाशेच्या आसपास सभा घेतल्या. याशिवाय अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्री, योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री राज्यात प्रचाराला आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही 78 सभा घेतल्या तर 26 रोड शो केले. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्याबरोबरच अनेक केंद्रीय नेते प्रचारात उतरले होते. राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रचारासाठी आले होते.
एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला
शेवटच्या टप्प्यातील 13 मतदारसंघांपैकी सात ठिकाणी भाजप,तर सहा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची माहविकास आघाडीशी लढत आहे. भाजपाचा आग्रह असतानाही मुख्यमंत्र्यांनी दक्षिण मुंबई, ठाणे व नाशिक ची जागा सोडली नाही. त्यामुळे य जागा निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. शिवाय ठाणे या आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शिवाय कल्याणमध्ये त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे मैदानात आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठीही हा टप्पा महत्वाचा असणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईत चार, ठाण्यातील दोन, याशिवाय नाशिक व पालघर अशा आठ जागा लढवत आहे. यातील सहा ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेशी त्यांचा थेट सामना होणार आहे. खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय जनता करेल असे उद्धव ठाकरे नेहमी सांगत असतात त्यामुळे जनतेच्या कौलाकडे स्वाभाविकच सर्वांचे लक्ष असणार आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
चुरशीची निवडणूक, प्रचारादरम्यान झालेल्या चकमकी लक्षात घेऊन सोमवारच्या मतदानासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. मुंबई शहरात 5 अपर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपआयुक्त, 77 सहायक पोलीस आयुक्तांसह 25 हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. याशिवाय 3 दंगल नियंत्रण पथके, गृहरक्षक दलाचे जवान ही तैनात करण्यात आले आहेत. केंद्रिय सुरक्षा दलाच्या 36 तुकड्या ही अतिरिक्त कुमक म्हणून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
पाचवा टप्पा 13 मतदारसंघ, 264 उमेदवार
प्रमुख लढती
धुळे(18) सुभाष भामरे (भाजप)
शोभा बछाव ( काँग्रेस)
दिंडोरी(10) : डॉ. भारती पवार ( भाजप)
भास्कर भगरे ( राष्ट्रवादी)
नाशिक (31) हेमंत गोडसे ( शिवसेना शिंदे)
राजाभाऊ वाझे ( शिवसेना ठाकरे)
पालघर (10). भारती कामडी (शिवसेना ठाकरे)
हेमंत विष्णू सावरा ( भाजप)
राजेश पाटील (बहुजन विकास आघाडी)
भिवंडी (27) कपिल पाटील ( भाजप)
बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी शरद पवार)
निलेश सांबरे (अपक्ष)
कल्याण (28). श्रीकांत शिंदे ( शिवसेना शिंदे)
. वैशाली दरेकर राणे ( शिवसेना ठाकरे)
ठाणे ( 24). राजन विचारे ( शिवसेना ठाकरे)
नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे)
मुंबई उत्तर (19) पियूष गोयल (भाजप)
भूषण पाटील ( काँग्रेस)
मुंबई उत्तर पश्चिम(21) अमोल किर्तीकर ( शिवसेना ठाकरे)
रवींद्र वायकर. ( शिवसेना शिंदे)
मुंबई उत्तर पूर्व(20) : मिहिर कोटेचा (भाजप)
संजय पाटील (शिवसेना)
दोन संजय पाटील
मुंबई उत्तर मध्य(27) : वर्षा गायकवाड ( काँग्रेस)
उज्वल निकम ( भाजप)
मुंबई दक्षिण मध्य(15) : राहुल शेवाळे ( शिवसेना शिंदे)
अनिल देसाई ( शिवसेना ठाकरे)
मुंबई दक्षिण (14) : अरविंद सावंत ( शिवसेना ठाकरे)
यामिनी जाधव ( शिवसेना शिंदे)