10.6 C
New York

Jalgaon Lok Sabha : भाजपसाठी जळगावमध्ये मोठी कसोटी?

Published:

2009 मघ्ये 96 हजार, 2014 मध्ये तीन लाख 83 हजार आणि 2019 मध्ये चार लाख 11 हजार. मागच्या तीन निवडणुकांमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये (Jalgaon Lok Sabha) भाजपचे (BJP) मताधिक्य वाढतच गेले. किंबहुना अधिक भक्कम झाले. चार लाख 11 हजारांचे मताधिक्य हा आकडा फक्त चर्चेचा नाही तर जळगावचा बालेकिल्ला भाजपसाठी किती भक्कम आणि एकतर्फी आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.

एवढे भक्कम आणि एकतर्फी निवडणुकीचे मैदान असूनही यंदाच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड कष्ट घ्यावे लागले. संकटमोचक समजल्या जाणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांना जळगावमध्ये मुक्काम ठोकावा लागला. नितीन गडकरी यांच्यापासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील अनेक आमदारांना जळगावमध्ये यावे लागले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जीवतोड मेहनत करावी लागली.

Jalgaon Lok Sabha नेमके भाजपला का एवढे कष्ट घ्यावे लागले?

भाजपच्या या धावपळीचे कारण ठरले ते उन्मेष पाटील आणि करण पवार-पाटील या दोन मित्रांची जोडगोळी. दोन महिन्यांपूर्वी भाजपने उन्मेष पाटलांना तिकीट नाकारले. माजी आमदार स्मिता वाघ यांना मैदानात उतरवले. यानंतर पाटलांनी आपला मित्र, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार-पाटील यांना जोडीला घेत थेट मातोश्री गाठले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या दोघांनी केलेले हे बंड भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरले. या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर उन्मेष पाटील स्वतःच लोकसभेच्या रिंगणात उतरतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी करण पवार-पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले. तेव्हापासून 13 मे रोजीचे मतदान होईपर्यंत पाटील-पवार या जोडगोळीने जळगावमध्ये वातावरण तयार केले होते. ठाकरेंच्या सभा लावण्यापासून ते स्वतःच्या प्रचारसभा, गाव टू गाव प्रचार, कोपरा सभा अशा गोष्टी केल्या.

या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचेही चांगली साथ मिळाली. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांनीही पाठबळ दिले. भाजपविरोधातील कथित लाट, जळगावमधील शिवसेना आमदारांचे बंड, उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग, उन्मेष पाटील यांचा जनसंपर्क, करण पवार-पाटील यांची राजकीय पार्श्वभूमी या गोष्टी महाविकास आघाडीसाठी प्लस ठरल्या. याशिवाय भाजपमधूनच आल्यामुळे उन्मेष पाटील आणि करण पवार यांना विजयासाठी भाजप कोणकोणत्या प्रकारची व्यूहरचना आखतो, याची माहिती होती. तीच त्यांनी हेरली आणि त्यावर काम सुरु केले. भाजपसाठी हीच होष्टी मोठी डोकेदुखी ठरली.

संजय राऊतांवर नगरमध्ये गुन्हा दाखल

आतापर्यंत गिरीश महाजन यांच्यावर थेटपर्यंत कोणताही नेता जळगावमध्ये आरोप करताना दिसून येत नव्हता. उन्मेष पाटलांनी थेट महाजनांनाच टार्गेट ठेवले. भाजपकडून प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच भोवती केंद्रीत ठेवण्यात आला. शिवाय राम मंदीर, कलम 370, तिहेरी तलाक अशा मुद्द्यांवरही भर देण्यात आला. दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भर देण्यात आला. यात मग अल्प दराने हैराण झालेले दूध उत्पादक, पीकविमा काढलेला असतानाही लाभ न मिळालेले हजारो केळी उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या अशा मुद्द्यांना हायलाईट करण्यात आले.

Jalgaon Lok Sabha जळगावमध्ये कागदावर महायुतीची ताकद..

जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अंमळनेर, एरंडोल, चाळीसगाव आणि पाचोरा असे सहा मतदारसंघ येतात. या सहाही मतदारसंघात सध्या महायुतीचे आमदार आहेत. यात जळगावर शहरमधून भाजपचे सुरेश भोळे, जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील, अंमळनेरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील, एरंडोलमधून शिवसेनेचे चिमणराव पाटील, चाळीगावमधून भाजपचे मंगेश चव्हाण आमदार आहेत. यातही गुलाबराव पाटील, अनिल भाईदास पाटील हे मंत्री आहेत. याशिवाय मंत्री गिरीश महाजन यांचीही जळगावर मोठी पकड आहे. त्यामुळे स्मिता वाघ यांचे पारडे जड वाटत आहे.

पण यानंतरही करण पवार पाटील यांनी सहाही मतदारसंघातून आपण लीड घेऊ असा दावा केला आहे. लेट्सअप मराठीसोबत बोलताना करण पवार म्हणाले, नेते पळून गेले असले तरीही 70 टक्के केडर आणि 100 टक्के कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. याशिवाय राजू देशमुख, मोरसिंग राठोड असे थोडक्यात निवडणूक हरलेले नेतेही सोबत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. पारोळा-एरंडोलमध्ये तर स्वतः आपण आहोत. चाळीसगावमध्ये उन्मेष पाटील यांनीही ताकद लावली आहे. त्यामुळे आपण सर्व मतदारसंघांमधून लीड घेऊ असे त्यांनी सांगितले आहे. एकंदरीत दोन्ही नेत्यांनी विजयाचे दावे केले आहेत. पण आता यश नेमके कोणाला येणार हे येत्या चार जूनला समजून येईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img