मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तोंड उघडले की वाद निर्माण होत आहेत. 10 वर्षातील कामाचे रिपोर्ड कार्डच नसल्याने लोकांना सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. नरेंद्र मोदी, हिंदू मुस्लीम करत नाही असे सांगतात व दुसऱ्याच दिवशी पुन्हा हिंदू मुस्लीमवर भाषण देतात. नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला असून मुद्देच नसल्याने मोदींना धार्मिक ध्रुवीकरणावर भर द्यावा लागत असल्याची घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा (Pawan Khera) यांनी केली आहे.
टिळक भवन येथे प्रत्रकार परिषदेला संबोधित करताना पवन खेरा यांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी सध्या मुलाखती देत सुटले आहेत पण ते जे बोलतात त्यातून त्यांचेच हसे होत आहे. मोदीजी असे कोणते औषध घेतात की काल काय बोलले ते आज विसरतात आणि भलतेच बोलतात. मोदींच्या मुलाखती म्हणजे ‘कपिल शर्माचा कॉमेडी शो’ वाटतो. युक्रेन युद्ध थांबवले म्हणणारे नरेंद्र मोदी आता गाजा पट्टीतील युद्ध थांबवल्याची शेखी मिरवत आहेत. मोदी मणिपूरला जाऊ शकले नाहीत. मणिपूरचे नाव घ्यायची त्यांची हिम्मत झाली नाही आणि युद्ध थांबवल्याच्या बाता मारतात. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचे हसे करुन ठेवले आहे. राहुल गांधी यांना शहजादे म्हणतात व राहुल गांधी बद्दल प्रश्न विचारताच कोन राहुल, असा उटला प्रश्न विचारतात. राहुल गांधी शहजादा नाहीत तर शहिदजादे आहेत आणि देशात एकच शहजादा आहे आणि तो म्हणजे अमित शाह यांचा मुलगा जय शाह, असा टोलाही पवन खेरा यांनी लगावला.
महाराष्ट्रात दोन पक्ष फोडणारा भाजपा खरी तुकडे तुकडे गँग आहे आणि लोकांना ही तोडफोड अजिबात आवडलेली नाही. महाराष्ट्रात इंडिया आघाडीची हवा दिसत आहे आणि महाराष्ट्रातील वातावरणाचा परिणाम गुजरातसह देशभरात दिसत आहे. महाराष्ट्रात इंडिया आघाडी ३५ जागा जागांवर विजयी होईल असा विश्वास पवन खेरा यांनी व्यक्त केला. ४ जूनला नरेंद्र मोदी यांना झोळी घेऊन निघावे लागले, त्यांनी नागपुरला दिक्षाभूमीवर जाऊन आत्मचिंतन करावे असा सल्लाही पवन खेरा यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणूक जनतेने हाती घेतली असून भाजपा व नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जनतेमध्ये प्रचंड राग आहे. महाविकास आघाडी बहुमताने जिंकेल असे चित्र दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात थोडीही माणुसकी राहिलेली नाही. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटेनत १६ जण ठार झाले व ७०-७५ लोक जखमी झाले. मृतांच्या नातेवाईंकांची व जखमींची भेट घेवून त्यांचे सांत्वन करण्याची माणुसकीही पंतप्रधान मोदी यांनी दाखवली नाही. घाटकोपरमधूनच रोड शो काढून नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असे नाना पटोले म्हणाले. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व सोशल मीडियाचे चेअरमन विशाल मुत्तेमवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया समन्वयक प्रगती अहिर उपस्थित होते.