11.6 C
New York

Nashik Loksabha : नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचं वजन वाढलं ?

Published:

महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज. सुरुवातीला महायुतीने हलक्यात घेतलेले पण आता जड जात असलेले नाव. हेच शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजप किंवा शिवसेनेकडून (ShivSena) नाशिक मतदारसंघातून Nashik Loksabha लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी उत्सुक होते. पण या दोन्ही पक्षांनी त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. आता याच शांतिगिरी महाजारांची मते नाशिकचा खासदार कोण होणार हे ठरविणार असल्याचे चित्र आहे.

Nashik Loksabha नेमके काय सुरु आहे नाशिकमध्ये पाहुया….

सुरुवातीला विद्यमान खासदार असूनही महायुतीमध्ये हेमंत गोडसे (Hemnat Godse) यांच्या नावावर घोळ घातला गेला. आधी भाजपकडून (BJP) गोडसेंविषयी नाराजीचा सूर आळविला गेला. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा आग्रह असल्याचे म्हणत राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले. पण त्यांच्यासाठी त्यांच्याच पक्षातील फारसे कोणी पुढे आले नाही. इकडे गोडसेही हट्ट सोडत नव्हते. रोज ते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन उमेदवारी जाहीर करण्याची मागणी करत होते. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच मतदारसंघांतील नावे जाहीर केली गेली. पण नाशिकमधील नाव जाहीर होत नव्हते.

या घडामोडींना वैतागून भुजबळांनी हा आपला अपमान आहे, असे समजून दावा मागे घेतला आणि गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर सुरु झाली गोडसेंची कमालीची धावपळ. गोडसे सध्या प्रचारात रात्रंदिवस एक करत आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत तीनवेळा नाशिक गाठून जोडण्या लावण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही गोडसेंसाठी सभा झाली. पण गोडसे यांच्याविषयी मतदारसंघात नकारात्मक वातावरण असल्याचे पाहणीत आढळून आल्याचा दावा करत स्थानिक भाजप प्रचारापासून काहीसे अंतर राखून आहे.

‘सांगली’साठी नकाराचं कारण कदमांनी सांगितलंच..

Nashik Loksabha नाशिकमध्ये तर फॉर्म भरल्यानंतर भुजबळ गायब

असेच काहीसे चित्र छगन भुजबळ यांच्याबाबतही आहे. ते दिंडोरीमध्ये भाजपच्या आणि नाशिकमध्ये शिवसेनेच्या प्रचारात दिसत नाहीत, असा आरोप आहे. नाशिकमध्ये तर फॉर्म भरल्यानंतर भुजबळ गायब झाले ते आठ दिवसांनंतर रॅलीत दिसले. नुकत्याच भारती पवार येवल्यात रॅलीसाठी होत्या. तिथेही भुजबळ नव्हते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोटोसाठी आले आणि हळूच मागे फिरले. अशात नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांचे कार्यकर्ते तुतारीचे काम करत असल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली होती.

नेमकी विरुद्ध गोष्ट महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत आहे. वाजे यांची उमेदवारी सर्वात आधी जाहीर झाल्याने त्यांनी प्रचाराची एक फेरी केव्हाच पूर्ण केली. त्यांच्या उमेदवारीवरुन माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर वगळता फारशी कोणाची नाराजी नाही. त्यामुळे आघाडीतील तीनही घटकपक्ष जोरकसपणे त्यांच्या प्रचारात उतरले आहेत. वाजे हे प्रथमच लोकसभेसाठी उमेदवारी करीत असल्याने विरोधकांनाही त्यांच्यावर टीका करण्यासाठी फारसे मुद्दे नाहीत. याचाही वाजे यांना लाभ होत आहे. वादरहित आणि संयमी नेतृत्व म्हणून वाजे यांच्याकडे पाहिले जाते.

Nashik Loksabha जय- पराजयाचे गणित बिघडू शकते.

पण या सगळ्यानंतरही या लढतीत अपक्ष शांतिगिरी महाराज किती मजल मारतात, यावर इथल्या विजयाचे प्रमेय ठरणार आहे. नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. नाशिकमध्ये तर तब्बल दोन लाखांहून अधिक भक्त परिवार असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे नाशिकमध्ये त्यांच्याकडे लक्ष लागून राहिले आहे. प्रचारातही त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. राजकारण्यांना दूर सारत यावेळी मतदार धर्मसत्तेला कौल देतील, असा विश्वास महाराजांच्या समर्थकांकरवी व्यक्त करण्यात येत आहे. भक्त परिवाराने एकगठ्ठा मते पदरात टाकली, तर दोन प्रमुख उमेदवारांच्या जय- पराजयाचे गणित बिघडू शकते.

Nashik Loksabha चंद्रकांत खैरे यांना मोठा फटका

शांतीगिरी महाराज यांनी यापूर्वी 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभेच्या मैदानात उडी घेतली होती. त्यावेळी त्यांनी दीड लाख मते घेत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले होते. त्यांच्या उमेदवारीचा तेव्हाचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मोठा फटका बसला होता. खैरेंचे त्यावेळी मताधिक्य अवघ्या 32 हजारांवर आले होते. त्यांच्या उमेदवारीचा हाच धोका ओळखून अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी गिरीश महाजन, दादा भुसे या मंत्र्‍यांनी शांतिगिरी महाजारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण तो फेल झाला.

त्यामुळे नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभा झाल्या तरी शांतिगिरी महाराज नेमकी कोणाची मते खाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यावरच ठाकरेंचे वाजे की शिंदेंचे गोडसे लोकसभेत जाणार की शांतिगिरी महाराजच विजय मिळविणार हे चार जूनलाच कळून येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img