मुंबई
अजितदादा पवार (Ajit Pawar) नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत अशाच बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजितदादा पवार यांना निवडणुकीच्या (Loksabha Election) कार्यकाळात घशाचे इन्फेक्शन झाले असल्याने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे. मात्र ते उद्यापासून प्रचारात सहभागी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
काँग्रेसने आरोप जे केले आहेत ते योग्य नाहीत. अजितदादा यांचासारखा मासलिडर ज्यांचे महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये,वॉर्डात, तालुका, जिल्हयात कार्यकर्ते आहेत. मतदारांचा मोठा वर्ग आहे. पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजुला ठेवून कोण स्वतः चे नुकसान करुन घेईल असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यात महायुतीला १५-१६ जागा मिळतील तर मविआला ३०-३५ जागा मिळतील अशी भविष्यवाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी काही वर्तमानपत्रात केली आहे. तशीच शरद पवार आणि रोहित पवार यांनीही भविष्यवाणी केली आहे. राज्यात निवडणूकीचे सर्व टप्पे पूर्ण झालेले नाहीत त्यामुळे अशी भविष्यवाणी करुन पुढच्या मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पवारसाहेबांकडे दिर्घ अनुभव आहे त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणार नाही. परंतु पृथ्वीराज चव्हाण हे फक्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत म्हणून टिव्हीवर काहीप्रमाणात टीआरपी मिळतो. पण त्यांना राज्यासंदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राजकारणावर भाष्य करावे एवढी उंचीही त्यांची नाही. ज्या विधानसभेत ते नेतृत्व करतात त्यांना त्यांच्याकडे स्वतःची ग्रामपंचायतदेखील नाही हे केवढे मोठे दुर्दैव आहे अशा शब्दात उमेश पाटील यांनी तोफ डागली.
कराड दक्षिणची जागा विलास काका पाटील- उंडाळकर हे बरीच वर्षे कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून येत होते. त्या जागेवर डोळा ठेवून पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना षडयंत्र करून विलासकाका पाटील यांना एका खून खटल्यात सहआरोपी केले. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना अडचणीत आणण्याचे पाप केले. ते सध्या जो काही साळसूदपणाचा आव आणतात त्यावरून त्यांनी राज्याची भविष्यवाणी करु नये असा सल्लाही उमेश पाटील यांनी दिला आहे.
अजितदादा पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही. हे मतदार ठरवतील. ४ जूनला त्याचे निष्कर्षही येतील. अहो अजितदादा पवार यांच्या पाठीशी ४०-५० आमदार आहेत. पण पृथ्वीराज चव्हाण तुमच्यासोबत किती आमदार आहेत असा संतप्त सवाल करतानाच कॉंग्रेसचा एकही आमदार त्यांच्या पाठीशी नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे भाष्य माध्यमांनी किती गांभीर्याने घ्यावे याचादेखील विचार करावा असेही उमेश पाटील म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी एकतर पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावे. निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील असा टोला लगावतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाष्य करण्याच्या भानगडीत पडू नये असा इशारा दिलाच शिवाय आधी आपली सार्वजनिक जीवनातील पत किती आहे हे तपासून पहावे अशी जोरदार टीकाही उमेश पाटील यांनी केली.
अहो आता माझी गाडी तपासली तरी माझ्या गाडीत ३-४ बॅगा सापडतील. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता राज्यात प्रचारासाठी फिरत असताना एवढे साहित्य ठेवतो. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री दौरा करणार त्यावेळी त्यांचे सामान सोबत असणारच आहे. शिवाय कर्मचारीही सोबत असतात त्यांचेही सामान असणार आहे. त्यात एवढे गहजब करण्याची काय आवश्यकता असा थेट सवाल उमेश पाटील यांनी विरोधकांना केला आहे.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे देशभर सुरु आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन काटेकोरपणे केलेले असते. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने घाटकोपर दुर्घटनेच्या ठिकाणी अशी परवानगी दिली गेली नाही. यापूर्वी या देशाचे दोन पंतप्रधान सुरक्षेच्या कारणास्तव गमावलेले आहेत. म्हणून सुरक्षा यंत्रणा काळजी घेत असते आणि त्यामुळेच प्रचाराचा कार्यक्रम सोडून तिथे भेट देणे शक्य झाले नाही असे सांगतानाच बेकायदेशीर होर्डिंगसंदर्भात कायदा बनवावा अशी मागणी येणाऱ्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस करेल असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.