मुंबई
हवामान विभागाने कोकणपट्ट्यासह मराठवाडा, विदर्भाला वादळी वाऱ्यासह (Heavy Rain) गारपिटीचा इशारा दिला होता. तसेच मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. रायगडमध्ये (Raigad) वादळी वाऱ्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाला (Mumbai Goa Highway) मोठा फटका बसला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मार्गावर लांबच लांब रांगा दिसत आहेत.
वादळी वाऱ्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एकाच ठिकाणी अडकल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. माणगाव रेल्वे स्टेशनजवळ मोठे झाड पडले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
महामार्गावर मोठ-मोठे कंटेनर, कार, एसटी बसेस यांची मोठी रांग लागली आहे. एकाच ठिकाणी अडकून राहिल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदतकार्य यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या रस्त्यावर पडलेले झाड बाजूला हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी रायगड पोलिसांनी देखील धाव घेतली आहे.
पुण्यातही होर्डिंग कोसळले
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय, जोराचा वारा देखील वाहू लागला आहे. त्यातच सायंकाळी साडेचारच्या सुमारास मोशीमध्ये रस्त्याच्या कडेला असलेले होर्डिंग कोसळले. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर न पडता विरुद्ध बाजूला पडले. होर्डिंगच्या बाजूला उभ्या असलेल्या चार वाहनांवर हे होर्डिंग पडले. यात वाहनांचे नुकसान झाले आहे.