मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. देशात लोकसभा (Loksabha) निवडणुकीचे 7 टप्प्यात मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. अद्याप राज्यात एका टप्प्यातील मतदान बाकी असतानाच 4 जूननंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार, असे संकेत शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत महाविकास आघाडीतील अनेक नेते लोकसभा निवडणुकीच्या चार जूनच्या निकालानंतर महायुतीत येतील, असे म्हटले होते. यावरच शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांनी आम्हाला निवडणुकीत मदत केली आहे हे सर्व नेते निकालानंतर महायुतीत येतील. याची तुम्हाला प्रचीती येईल, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मी ठाणे, कल्याण आणि मुंबईतला खासदार राहुल शेवाळे यांचा दौरा करुन आलो. खूप चांगलं वातावरण आहे. महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी आज घणसोलीत ज्या ठिकाणी सातारा, कराड या भागातील नागरीक जास्त राहतात तिथे संध्याकाळी संयुक्त मेळावा घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या रोड शोमुळे पूर्ण वातावरण महायुतीमय झालं आहे. महाराष्ट्रातले मतदार हे महायुतीच्या मागे उभे आहेत. उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त सभा आहे. या सभेचा अजून फायदा होणार आहे. सरकारने जे काम केलं आहे त्याची पोचपावती जनता देणार आहे. महायुतीच्या 45 पेक्षा जास्त जागांवर विजय होईल, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला.
मुंबईतील मतदार महायुतीच्या पाठीशी आहेत. मुंबईत महायुतीमय वातावरण आहे. शिंदे सरकारने जी कामगिरी केली, त्याची पोचपवाती महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला मागील 4 टप्यात दिली आहे आणि मुंबईही देणार आहे. देशातील अनेक मोठ्या शहरात मोदींचे रोड शो केले आहेत. मोठ्या व्यक्तींच्या रोड शोला काही सुरक्षेच्या कारणास्तव उपायोजना कराव्या लागतात. विरोधकांच्या टीकेचा आमच्या विजयावर काही परीणाम होणार नाही असं शंभूराज देसाई म्हणाले.