शंकर जाधव, डोंबिवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची कल्याण (Kalyan) येथे बुधवार 15 तारखेला जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde group) जिल्हाप्रमुख अरविंद मोरे (Arvind More) यांना व्यासपीठावर निमंत्रण दिले नाही. सभेत आपल्याला मान सन्मान दिला नसल्याने मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण अशा एकूण 13 मतदारसंघांत मतदान होणार आहे. निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा असल्यामुळे महाराष्ट्रभर पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा घेण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांची कल्याणमध्ये भव्य सभा आयोजित केली आहे. ही सभा कल्याण पश्चिम येथील व्हरटैक्स मैदानातील आधारवाडी जेल चौक येथे आयोजित करण्यात आली असून या सभेत महायुतीचे अनेक बडे नेते, कार्यकर्ते त्याचबरोबर पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. मात्र या सभेच्या काही तासांपूर्वीच कल्याण मुरबाड मधील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी राजीनामा दिला.
याबाबत अरविंद मोरे म्हणाले, मी या कल्याण मुरबाड शहराचा जिल्हाप्रमुख असूनही व्यासपीठावर निमंत्रितांमध्ये माझे नाव नाही. मात्र महायुतीच्या या सभेसाठी व्यासपीठावर 52 जणांना आमंत्रित करण्यात आले. मला डावलले असल्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख हे सेनेमध्ये मानाचे पद आहे पण जर माझ्या पदाला मान सन्मान मिळत नसेल तर मग पद कशाला?