कोलकता : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) पाठिंब्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास आपण बाहेरून पाठिंबा देऊ, असे घुमजाव ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
इंडिया आघाडीच्या स्थापनेपासूनच चार हात लांब राहिलेल्या ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. किंबहुना त्यांनी एकला चलो रे ची वाट धरली होती. पण, बंगालमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांचा आणि देशभरातील निकालांचा अंदाज घेता ममता बॅनर्जी यांनी नरमाईची भूमिका घेत घुमजाव केले आहे.
Mamata Banerjee : …तर बाहेरून पाठिंबा देऊ
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ. आम्ही आघाडीला नेतृत्व देऊ. बंगालमध्ये १०० दिवसांची रोजगार गॅरंटी योजनेत महिला आणि मुलींना त्रास होऊ नये, म्हणून आम्ही हि भूमिका घेतली आहे.” इंडिया आघाडीने सीपीएमला सोबत घेतले आहे शिवाय बंगाल काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे तृणमूल काँग्रेसचे बंगालमध्ये विरोधक आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत, असे ममता यांच्या भूमिकेवरून स्पष्ट होते.
हेही वाचा : मोदींच्या रोड शो साठी मेट्रो वाहतूक राहणार बंद
लोकसभेच्या देशातील ७० टक्के मतदारसंघांचे मतदान झाले आहे. अशा टप्प्यावर ममता यांनी केलेले हे विधान महत्वाचे मानले जात आहे. भाजपचे वर्चस्व असलेल्या उत्तर भारतीय हिंदी भाषिक प्रांतात येणाऱ्या टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. त्यामुळे भाजप ४०० पार जाणार का, हे येणाऱ्या टप्प्यांमध्येच स्पष्ट होणार आहे. दक्षिण आणि पूर्व भारतात भाजपला मिळणाऱ्या कमी जागांची भरपाई उत्तर भारतात होऊ शकते.