ओतूर,प्रतिनिधी (रमेश तांबे)
राज्यातील लोकसभेच्या Loksabha चौथ्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी दि.१३ रोजी सकाळपासून सुरूवात झाली असून, ओतूर आणि परिसरातील सर्वच केंद्रावर सकाळीच मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदारांनी मतदानाचा हक्क बजविण्यासाठी रांगा लावून, शांततेत मतदान केले. येथील सर्वच केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदान करण्यासाठी,मतदार आले होते.दरम्यान या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह ग्रामीण भागातही मतदानाचा टक्का घसरल्याचे निदर्शनात आले.
ओतूर केंद्राअंतर्गत ओतूर गावठाणात ८,डोमेवाडी १,पानसरेवाडी १, कोळमळा २,शेटेवाडी १,चिल्हेवाडी १,पाचघर १,अहिनवेवाडी १,मांदारणे १,आंबेगव्हाण १,रोहोकडी १,मेंगाळवाडी १,फापाळेशिवार २ अशा एकूण २२ मतदान केंद्रांवर सहा वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान झाले.तर जुन्नर तालुक्यात एकूण ५८.१५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाडगे,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र सबनीस यांनी दिली. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्यात लक्षवेधी लढत होत असून, या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही उमेदवारांनी विजय आपलाच होणार असल्याचा दावा केला आहे.
शिरूर मतदार संघामध्ये मोठी चुरस
शिरूर मतदार संघामध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून,शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ.अमोल कोल्हे यांच्यामध्ये जोरदार सामना रंगला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिरूर मतदार संघात सर्वच भागामध्ये प्रत्येक उमेदवाराची कमीअधिक ताकद असल्याने, आज तरी विजयाचा अंदाज बांधणे कठीण होत आहे.
ओतूर आणि आजूबाजूच्या मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली.मतदारांनी रांगा लावून,शांततेत मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या सत्रात मतदानासाठी गर्दी होती, दुपारी ऊन असल्याने,ग्रामीण भागात मतदानाची गती संथ होती. ज्या, त्या गटाचे कार्यकर्ते मतदान करून घेण्यासाठी नागरिकांना मतदान केंद्रावर घेऊन जात होते.दुपारी सव्वा चार वाजता पाऊसाने हजेरी लावली. पुन्हा पाऊसाने उघडीप दिल्याने,मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात, मतदारांनी मतदानाचा हक्क बजविण्यासाठी गर्दी केली होती.कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,तसेच निवडणूक प्रक्रिया दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.सायंकाळी सहा वाजता निवडणूक प्रक्रिया संपली आणि दोन्ही उमेदवारांचे भविष्य मतदानरूपी मशीनमध्ये बंद झाले आहे.