Ghatkoper : मुंबईकारांचा महापालिका अधिकाऱ्यांना सवाल
रमेश औताडे / मुंबई
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना श्रीमंतांची अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत. मुंबईतील सामान्य माणसाचे घर तोडणारे अधिकारी अनधिकृत होर्डींग का तोडत नाहीत, असा सवाल मुंबईतील सामान्य नागरिक करत आहेत. मुंबईतील घाटकोपर (Ghatkoper) येथे एक महाकाय बेकायदा होर्डिंग कोसळून १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर या घटनेसाठी कंत्राटदार भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) नावाची व्यक्ती जबाबदार असल्याची माहिती समोर आली आहे. भावेश भिंडे याला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. १० दिवसांच्या आत परिसरातील बेकायदेशीर होर्डिंग हटवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
Ghatkoper : ते होर्डिंग बेकायदा
मुंबईतील २४ नागरी प्रभागांमधील कोणत्याही होर्डिंगसाठी परवाना रद्द केला जाईल, असंही सांगण्यात आलं आहे. जे होर्डिंग कोसळले आहे, ते गृह विभाग आणि महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळाच्या मालकीच्या जमिनीवर मुंबई महानगर पालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आले होते. सोमवारी मुंबईसह उपनगरात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने घाटकोपरच्या छेडा नगर जिमखाना, रिक्रिएशन सेंटर ३ येथील अंदाजे १२० x १२० फुट इतक्या महाकाय आकाराचे होर्डिंग जमिनीतून उन्मळून जवळच्याच पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळलं. त्यावेळी जवळपास १५० वाहनं पेट्रोल पंपावर होती. काही पावसापासून आश्रय घेण्यासाठी ते पेट्रोल पंपावर थांबले होते. काही क्षणात हे होर्डिंग्स कोसळले. जवळ असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले.
हेही वाचा : होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी ठाकरे गटाचा कार्यकर्ता- उदय सामंत
मृतांमध्ये पूर्णिश जाधव (वय 50), दिलीप पासवान (34), बशीर अहमद (52), फहिम खलील खान (22), हंसनाथ गुप्ता (71), सतीश सिंह (52), चंद्रमनी प्रजापती (45), महंमद अक्रम (48), भारत राठोड (24), दिनेशकुमार जैस्वार(44), सचिन महेशकुमार यादव ( 23) अशी या बारा जणांची नावे असून अन्य दोघांची अद्यापही ओळख पटलेली नाही.
पालिका जास्तीत जास्त ४० x ४० चौरस फूट होर्डिंग उभारण्याची परवानगी देते मात्र, कोसळलेले होर्डिंग १२० x १२० चौरस फूट आकाराचे होते. सध्या एन वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी एजन्सीला वैध परवानगी नसल्याबद्दल त्यांचे सर्व होर्डिंग तातडीने काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे.