मुंबई
मुंबईत काल वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील होर्डिंग (Ghatkopar Hoarding) कोसळल्याने त्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपर (Ghatkopar) येथील दुर्घटनास्थळाची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. या घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 75 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर 78 हून अधिकांना वाचवण्यात यश आले आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिघा- चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सोमवारी अचानक सुटलेल्या वादळामुळे घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर 120 फुटांचे होर्डिंग कोसळले. त्यामध्ये 100 हून अधिक जण अडकल्याची माहिती होती. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते. हे बचावकार्य रात्रभर सुरू होते. मात्र आज सकाळी मृतांचा आकडा वाढला आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात इगो मीडियाचे मालक आणि अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मालक भावेश भिडेसह अन्य व्यक्तींविरोधात कलम 304, 338, 337, 34 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनुसार हे होर्डिंग अनधिकृत होतं, त्यासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. पेट्रोल पंप असल्यामुळे होर्डिंग गॅस कटरने कापणं शक्य नव्हतं. कारण त्यामुळे आग लागण्याचा धोका होता. घटनास्थळी लगेच मोठ मोठ्या क्रेन्स मागवण्यात आल्या. त्यांच्या माध्यमातून लोखंडी आणि स्टीलचे रॉड हटवण्यात आले.
घाटकोपर परिसरात झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत भाजपचे आमदार राम कदम यांनी उडी घेत या दुर्घटनेप्रकरणी थेट उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि पेट्रोल पंप मालक भावेश भिडे यांचा फोटो ट्विट केला आहे. भाजप नेते राम कदम यांनी या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.