रमेश औताडे, मुंबई
घाटकोपर होर्डींग (Ghatkopar Hoarding) प्रकरणात लोहमार्ग पोलीसही तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) संबंधित लोहमार्ग पोलीस अधिकारी वर्गावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांनी महाराष्ट्र शासन आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
लोहमार्ग पोलिस परवानगी देते भाडे घेत असल्याने त्यांची जबाबदारी अधिक आहे. घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. पोलिसांनी जाहिरात कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. लोहमार्ग पोलिसांनी परवानगी दिली पण त्यासाठी पालिका प्रशासनाची परवानगी घेतली गेली नाही उलट पालिकेने मागील वर्षी या होर्डींग प्रकरणात कारवाई करण्यासाठी लेखी पत्र पाठविले होते. मुंबईत 40 बाय 40ची होर्डींग परवानगी पालिका देते पण कोसळलेल्या होर्डींग चा आकार 120 बाय 120 चा होता.
7 डिसेंबर 2021 रोजी लोहमार्ग पोलिसांनी एगो मीडिया कंपनीस कंत्राट दिले होते. याप्रकरणी चौकशी करत संबंधित लोहमार्ग पोलीसअधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी गलगली यांची आहे. मुंबईत रेल्वे, एमएमआरडीए, बीपीटी, म्हाडा, एमएसआरडीसी यांनी होर्डींग लावताना पालिकेची परवानगी घेणे आवश्यक असून सद्यस्थितीत सर्व होर्डींगचे सुरक्षा ऑडिट केले जावे अशी मागणी गलगली यांनी केली आहे.