मुंबई : मुंबई, पुणे शहरांत बॉम्बस्फोट (Bomb Threat) घडवून आणण्याच्या धमक्या नेहमीच दिल्या जातात. पण, यावेळी महाराष्ट्रातील आणखीही काही शहरांत बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. सांगली शहर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सांगली शहर पोलीस ठाण्यात फोन करून एका अज्ञाताने आपण दहशतवादी (Terrorist) असून माझयासोबत आणखी पाच व्यक्ती आहेत. आम्ही पाचजण मिळून मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देणार आहे, अशी धमकी दिली. दहशतवाद्यांना दिलेल्या कामगिरीप्रमाणे हे पाचही जण नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचले आहेत. आम्ही आरडीएक्सने ही पाच रेल्वे स्थानके उडवून देणार आहे, असेही या संशयिताने म्हटले आहे.
हेही वाचा : होर्डींग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण- पटोले
Bomb Threat : कसून तपासणी
या धमकीची गंभीर दखल घेत पोलिस अधिक्षक संदीप घुगे, अतिरिक्त अधिक्षक रितू खोकर यांच्यासह पोलिस पथकांनी सांगली व मिरज स्थानकांचा परिसर पिंजून काढला. प्रत्येक संशयास्पद वस्तूची, व्यक्तीची कसून तपासणी केली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात सर्व प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Bomb Threat : संशयास्पद वस्तू आढळली नाही
संशयित व्यक्तींची, वाहनांची झडती घेण्यात आली. पण, पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. यादरम्यान, बॉम्बशोध पथकाने सांगली व मिरज स्थानकांत कसून तपासणी केली. त्यावेळी कोणतीही अनुचित बाब आढळली नाही. या मोहिमेत सांगली, मिरजेतील पोलिस अधिकारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, दंगलविरोधी पथक, दहशतवादविरोधी पथक आदींनी सहभाग घेतला.
हेही वाचा : जरांगे पाटलांची पुन्हा उपोषणाची घोषणा