शिरूर
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहेत. देशात 96 ठिकाणी तर राज्यातील 11 मतदारसंघात मतदान पार पडत आहे. राज्यात आज होत असलेल्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय बहुतव्य मतपेटीत बंद होणार आहे. मतदानाच्या दिवशी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. ऐन मतदानाच्या दिवशीच वळसे पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, निवडणुकीमध्ये शरद पवार यांची सहानुभूतीची लाट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रकृतीच्या कारणास्तव यंदा मला सक्रिय प्रचारात सहभाग नोंदवता आला नाही. याची मला खंत वाटते. यावर्षी प्रथमच निवडणूक मुद्यांवर झाली नाही. केवळ तो काय म्हणाला हा काय म्हणाला यावर ही निवडणूक लढली गेली. या निवडणुकीत शरद पवार यांना सहानुभूतीची लाट मिळेल असे वाटते, असे दिलीप वळसे पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी व बीड या 11 मतदार संघात सध्या मतदान सुरू आहे. सकाळच्या सत्रात मतदार घराबाहेर पडून हिरीरीने मतदान करत आहेत. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी उपरोक्त विधान केले आहे.
राज्यघटनेने सर्वांना मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यांनी नागरिकांनी सजग राहून हा अधिकार बजवावा. आपल्या आवडीचे व देशाचे हित करणारे सरकार आले पाहिजे. त्यामुळे सर्वांनी विशेषतः तरुणांनी भरभरून मतदान केले पाहिजे, असे वळसे पाटील म्हणाले.
लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळत असल्याचे वक्तव्य यापूर्वी देखील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केले होते त्यानंतर आता पुन्हा अजित पवार गटाचे नेते दिलीप बोरसे पाटील यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या सहानुभूती संदर्भात केल्याने नेमकं अजित पवार गटात चालला तरी काय आहे यावर चर्चा सुरू झाली आहे.