Mhaisal Project : काम तातडीने मार्गी लावण्याचे आ. विक्रम सावंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
प्रतिनिधी/जत : जत पूर्व भागासाठी वरदान ठरणाऱ्या विस्तारित योजनेचे काम पहिल्या टप्प्यात जत तालुक्यातील येळदरीपर्यत पूर्ण होणार आहे. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह म्हैसाळच्या (Mhaisal Project) अधिकाऱ्यांनी येळदरी व बेळुंखी येथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.
यावेळी म्हैसाळ विभागाचे प्रमुख अधीक्षक कार्यकारी अभियंता पाटोळे, कार्यकारी अभियंता सचिन पवार, उपअधीक्षक जाधव ,गडदे, विस्तारित योजनेचे शाखा अभियंता माळी, खरात, कांबळे ,घाटगे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, येळदरीचे सरपंच राम सरगर, धानम्मा देवी दूध संघाचे संचालक रावसाहेब मंगसुळे आदी उपस्थित होते.
जत येथे आ. सावंत यांनी म्हैसाळच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. आ. सावंत यांनी तालुक्यात सुरू असलेल्या म्हैसाळ योजनेचा आढावा घेतला. यावेळी विशेष करून विस्तारित म्हैसाळ योजनेचा त्यांनी संपूर्ण आढावा घेतला. बैठकीनंतर जत पूर्व भागासाठी वरदान ठरणाऱ्या या विस्तारित योजनेचे काम पहिल्या टप्प्यात येळदरी पर्यत पूर्ण होणार आहे. येळदरी व बेळुंखी येथे सुरू असलेल्या कामांची आ. सावंत यांनी स्वतः अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
हेही वाचा : केवळ एका मतासाठी पठ्ठ्याने दुबईवरून थेट संभाजीनगर गाठलं
Mhaisal Project : जत पूर्व भागातील एकही गाव वंचित राहणार नाही
यावेळी बोलताना आ. सावंत यांनी जत पूर्व भागातील सर्व तलावात, गावात म्हैसाळचे पाणी पोहचले पाहिजे अशा पद्धतीने आराखडा व नियोजन करा. जत पूर्व भागातील एकही गाव वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, पावसाळा सुरू होताच म्हैसाळ योजनेतून तालुक्यातील पाझर तलाव , कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व साठवण तलाव हे पावसाळ्यात भरून द्यावे अशा सूचना आ. सावंत यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.