21 C
New York

Leopard : काळवाडीत ‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद!

Published:

रमेश तांबे, ओतूर

जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथे दि. ८ मे रोजी रूद्र महेश फापाळे या ८ वर्षे वयाच्या मुलावर बिबट्याने (Leopard) हल्ला केल्याने, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. काळवाडीत रूद्र फापाळे याच्यावर हल्ला केलेल्या ठिकाणापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी दि.१३ रोजी पहाटे ४ वाजता बिबट्याची मादी जेरबंद झाली असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. सदर बिबट्याच्या मादीचे वय ५ ते ६ वर्षे आहे.जेरबंद केलेल्या बिबट मादीला, रेस्क्यू टीमचे सदस्य व वन कर्मचाऱ्यांनी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात नेले असल्याचे श्री काकडे यांनी सांगीतले.

यात्रेनिमित्त आत्याच्या गावी आलेल्या रूद्र महेंद्र फापाळे वय ८ वर्ष,मुळ राहणार बदगी बेलापूर ( ता.अकोले ) जि.अहमदनगर या चिमूरड्यावर बिबट्याने हल्ला केल्याने रूद्र याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथे घडली होती.या घटनेमुळे काळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

रूद्र चे आजोबा रोहिदास काकडे हे घराशेजारील शेतात गवत काढत होते, त्यावेळी रूद्र हा आजोबांच्या जवळच खेळत असताना,ऊसातून बिबट्या आला आणि त्याने चिमूरड्या रूद्र वर झडप मारून,त्याच्या मानेला पकडून शेजारील ऊसाच्या शेतात ओढत नेऊन त्याच्यावर  जीवघेणा हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. सदरची घटना घडल्यानंतर वनविभागाने या ठिकाणी १२ पिंजरे लावले होते. तसेच ट्रॅप कॅमेरे व थर्मल ड्रोन च्या साह्याने बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी अद्यापही रात्रंदिवस पहारा देत आहेत.

जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या होणाऱ्या वारंवार हल्ल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, कधी बिबट्याचा हल्ला होईल,या भीतीने जनता भयभीत झालेली आहे. एकतर बिबट्याची नसबंदी करा किंवा तालुक्यातील सर्व बिबट्यांना पकडा आणि बिबट्या दिसताक्षणी त्याला गोळ्या घाला,अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img