रमेश तांबे, ओतूर
ओतूर बस स्थानक (Otur Bus Stand) दिवसेंदिवस विविध समस्यांनी ग्रासले असून, पहिल्याच पडलेल्या अवकाळी पावसाने बस स्थानकातील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, या खड्ड्यांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या खाजगी वाहने व एसटी गाड्यांची चाके खड्ड्यात जाऊन डबक्यात साचलेले पाणी आजूबाजूच्या इतर वाहनांवर उडत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
ओतूर बस स्थानकाच्या डांबरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपूर्वी झाले असून, डांबरीकरण करताना बसस्थानकातील नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्यासाठी परिवहन महामंडळाने ठोस उपाययोजना केल्या नसल्याने, ही समस्या निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात बस स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे या ठिकाणावरून जाणाऱ्या येणाऱ्या एसटी बस तसेच दुचाकीस्वार, खाजगी वाहनचालक व प्रवाशांना याचा त्रास होत आहे. रविवारी सकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे बस स्थानकात पाणी साठल्याने येणाऱ्या जाणाऱ्यां वाहनांना व प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. पावसाळा सुरू झाला की, बस स्थानकात पाण्याचे मोठे डबके साचत असल्याने, बस स्थानकात वाहनचालकांना वाट शोधत,वाहन चालवावे लागते.दरवर्षी पावसाळ्यात या ठिकिणच्या खड्ड्यात पाणी साचून,खड्डा अधिकच वाढत आहेत.या बस स्थानकात खाजगी वाहने पार्किंग करत असल्याने याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या एसटी चालक आणि प्रवाशांना होत आहे.