रमेश तांबे, ओतूर
ओतूर ता. जुन्नर (Junnar) येथील बाबीतमळा, पाथरटवाडी, इरवड शिवारात वानरांनी ठिय्या मांडला असून वानरांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे.
दिवसेंदिवस या परिसरात वानरांचा उपद्रव वाढला आहे.शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात वानर नुकसान करत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. ओतूर येथे मागील चार वर्षांपुर्वी तीन ते चार वानर आले होते, गावात खाण्यासाठी त्यांना खाद्य मिळत नसल्याने, त्यांनी आपला मोर्चा ओतूर येथील बाबीतमळा,पाथरटवाडी,इरवड, फापाळेशिवार या ठिकाणी वळवला.
मागील चार वर्षांपूर्वी याशिवारात हे वानर आले असून,आता त्यांची संख्या पंन्नासच्या वर गेलेली आहे.सदर वानर हे टोळीने राहत असून, वानरांनी शेतकऱ्यांच्या आंबा,केळी,कोबी,मका,टोमॅटो,भुईमूग,ऊस,भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. शेतातील उभ्या पिकात घुसलेले वानर शेतकरी हुसकायला गेले तर, वानर हे शेतकऱ्यांच्या अंगावर धावून येतात तसेच वानरांचा त्रास महिला व लहान मुलांनाही होत आहे. मळ्याकडे जाताना, वानरे त्यांच्या अंगावर धाऊन जाण्याचे प्रकार घडत आहेत.या वानरांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
सध्याच्या तीव्र उन्हाळ्यातही शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला पिकविण्यासाठी पराकाष्ठा करत असून, घाम गाळून मेहनतीने पिकवलेली भाजीपाला पिकाचे वानर मात्र अतोनात नुकसान करत आहेत.
या परिसरातुन गेलेल्या उच्च विद्युत वाहिनीच्या टॉवरवर व रात्रीच्या वेळी याच शिवारातील झाडांवर त्यांचा मुक्काम असतो.या वानरांच्या सततच्या उपद्रवामुळे येथील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मोठ-मोठी झाडे देखील तोडून टाकली आहे.
जुन्नर तालुका हा बिबट प्रवण क्षेत्रात येत असून तालुक्यामध्ये बिबट्यांचे वाढते प्रमाण हा येथील नागरिकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. याचप्रमाणे वनविभागाने वानरांच्या टोळीचा योग्य वेळी बंदोबस्त केला नाही तर,या परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्या सारखा वानरांचा डोकेदुखीचा गंभीर विषय होणार आहे.