नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा कामकाजाला सुरुवात केली आहे. आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) लोकसभा निवडणुकी करिता आज जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात (AAP Manifesto) अरविंद केजरीवाल यांनी मोठ्या घोषणा केल्या आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल देखील केला आहे.
आम आदमी पार्टीच्या वतीने आज नवी दिल्ली येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे या जाहीरनाम्यात म्हटले आहे की देशभरातील गरीबांना 200 यूनिट मोफत वीज देण्यात येईल. देशातील नागरिकांना वर्षभरात 2 कोटी नोकऱ्या देण्यात येतील, अशी घोषणा करतानाच केजरीवाल यांनी देशातील जनतेला 10 गॅरंटी दिल्या. यावेळी त्यांनी मोदींच्या गॅरंटीची पोलखोलही केली. मोदींनी प्रत्येक व्यक्तीला 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. ती कधीच पूर्ण केली नाही. दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं, तेही हवेतच विरलं. त्यांनी 2022पर्यंत बुलेट ट्रेन सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. तेही पूर्ण केलं नाही, असा हल्लाच अरविंद केजरीवाल यांनी चढवला.
आम्ही वीज मोफत देण्याची गॅरंटी दिली होती. शाळा उत्तम दर्जाच्या करण्याचं आश्वासन दिलं होतं. आम्ही ते करून दाखवलं. मोदींची गॅरंटी कोण पूर्ण करेल? कारण ते 75 वर्षाचे झाले आहेत. ते आता रिटायर होतील. त्यामुळे त्यांची गॅरंटी भाजपमधून कोणीच पूर्ण करणार नाही. या गॅरंटी केजरीवाल यांनाच पूर्ण करायच्या आहेत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले,
एखाद्या देशात लाखो लोक अशिक्षित असतील तर याचा अर्थ शिक्षणाचं धोरण कुठं तरी चुकतंय. असं असेल तर देश पुढे जाणार नाही. देशातील जनता स्वस्थ असेल तर देशाचा विकास होईल. एखादा पंतप्रधान देशाला पुढे नेऊ शकत नाही. देशाची जनताच देशाला पुढे घेऊन जात असते. आज देशातील सरकारी रुग्णालये घाणेरड्या अवस्थेत आहेत. आमची सत्ता आली तर देशातील प्रत्येक मोहल्ल्यात मोहल्ला क्लिनिक असेल, असं केजरीवाल म्हणाले.