एडस आणि त्यानंतर आलेल्या कोरोना-१९ च्या लाटेने रोगप्रतिकारक शक्तीचे महत्व अधोरेखित झाले. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे स्त्रोत लोकं शोधू लागले. त्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा उत्कृष्ट स्रोत म्हणजे अंडी (Eggs) हे लोकांच्या लक्षात आले आणि लोकांचा अंडी खाण्याकडे कल वाढू लागला. कोरोना नंतर अंडी खाण्यात ३०ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण अनेक संस्थांनी नोंदविले आहे. शहरी भागात ४०टक्के कुटुंबे तर ग्रामीण भागात ६० टक्के कुटुंबे अंडी खातात. भारतात २०१८ मध्ये एकूण १० हजार कोटी अंड्याचे उत्पादन झाले होते तर २०२० मध्ये १५ हजार कोटी अंड्याचे उत्पादन झाले,तर २०२१-२२ मध्ये १२९.६०,बिलियन अंड्याचे उत्पादन झाले.(१ बिलियन म्हणजे १०० कोटी.)
भारत हा जगात तिसरा अंडी उत्पादक देश आहे,तर मांस उत्पादनात आठवा देश आहे. भारतात पुढील राज्यात प्रामुख्याने अंडी उत्पादन होते.
आंध्रप्रदेश–१४.४१ टक्के.
तामिळनाडू–१६.०८ टक्के.
तेलंगणा–१२.८६ टक्के.
बंगाल–८.०८ टक्के.
कर्नाटक–६.३८ टक्के.
भारतात सर्वात जास्त अंड्याचे उत्पादन आंध्रप्रदेश त होत असल्याने त्या राज्याला “Eggs Basket of Asia” असे म्हणतात. तामिळनाडू राज्यातील नमक्काल जिल्ह्याला “अंड्याचे शहर”(Eggs city) म्हणतात. कारण येथे सर्वात जास्त अंड्याचे उत्पादन होते. भारतात वर्षाला सरासरी ८१ अंडी खाल्ली जातात तर बरीच लोकं आठवड्याला ७ ते १० अंडी खातात.
ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ फायदे…
चेन्नई शहरात दर दिवशी ५५ लाखांपेक्षा अधिकअंडी खाल्ली जातात तर मुंबईत हीच संख्या ८० लाखापेक्षा अधिक आहे. अंडी हा सर्वच वयोगटातील लोकांचा परिपूर्ण आहार झाला असून हा सर्वसामान्यांना परवडणारा आरोग्यदायी अन्न अशी मान्यता ही अंड्याला प्राप्त झाली आहे. एक अंडे १३ आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि ६ ग्राम प्रथिने (प्रोटिन्स) देते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी महत्वाचे आहे.असा दावा अमेरिकेतील इंटरनॅशनल एग कमिशन ने केला आहे.
सामान्यतः एका अंड्यात साखर १.१ ग्रॅम, कॅल्शियम ५टक्के,मॅग्नेशियम २ टक्के,बी-कॉम्लेक्स जीवनसत्त्व १८ टक्के,प्रथिने १३ ग्रॅम, लोह ६ टक्के, जीवनसत्त्व ए १०.टक्के तर पोटॅशियम १२६ मिलिग्रम असतात. यामुळे च अंड्याला पौष्टिक समजण्यात येते. सामान्यतः चाकोरपक्षी, मोर,कोंबडी, चिमणी यांची अंडी शरीरास हितकर आहेत. व्यवहारात मात्र कोंबडीच्याच अंड्याचा वापर केला जातो. आयुर्वेद शास्त्रानुसार अंडे हे शुक्रवर्धक,कामेच्छा वाढविणारे,मधुर विपाकी पचण्यास जड,शरीरातील सर्व धातू घटकांना ताकत देणारे आहे व अभिष्यंदी आहे.काही पुस्तकांत अंडी ही अभिष्यांदी असल्याचे म्हटले आहे तर काहींमध्ये याचा उल्लेख नाही. हृरोग, जीर्ण खोकला,क्षय (टी. बी.)विर्यनाश,शरीर बारीक असणे,जखमा इ.आजारांसाठी अंडी हितकर व ताकत देणारी आहेत.
शिजवलेल्या अंड्यापेक्षा कच्चे अंडे हे पचनास हलके असते. सकाळी कच्चे अंडे दुधात मिश्र करून प्यावे व त्यानंतर द्राक्षासाव घेतले असता त्या अंड्याचे पचन लवकर व चांगल्या प्रकारे होते. अंड्याने शरीरघटकांचे जननसामर्थ्य वाढविले जाते त्यामुळे शुक्र धातू सहित सर्वच धातूंची पुष्टी व वाढ लवकर होते. पोटात एखादा क्षार किंवा आम्लपदार्थ जाऊन आतड्याचा भाग भाजला असेल तर अशा वेळी कच्या अंड्याचा पांढरा भाग खाण्यास द्यावा.
गर्भाचे पोषण नीट होत नसेल तर गर्भाची वाढ होण्यासाठी अंडे द्यावे किंवा अंडे असलेले मधु मालिनी वसंत रस या गोळ्या द्याव्यात. याने गर्भाची वाढ लवकर व चांगली होते. कुक्कुटा अंडत्वक भस्म -अंड्यावरती जे सफेत टरफल असते त्याचे भस्म. हे सफेत पाणी जाणे,दमा, खोकला,
खोकल्याबरोबर रक्त जाणे. मुडदूस, हाडे कमजोर असणे.यात उपयोगी आहे. आयुर्वेदानुसार अंड्यानी मनाचा “तामस”हा दोष वाढतो. अवरोध(अडथळा) निर्माण करते व गुरुता (जडपणा) उत्पन्न करते त्यास अभिष्यंदी द्रव्य म्हणतात. म्हणुनच अंडी कोणी व किती खावीत याला मर्यादा आहे. हे संशोधनाने ही सिद्ध झाले आहे.
ब्राऊन राइस खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ फायदे…
सर्वसामान्य पणे व्यक्तीला दररोज ६०ग्रॅम तर स्त्रीला ५५ ग्रॅम ची प्रथिनांची(प्रोटीन)आवश्यकता असते.शरीर बांधणी व रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असणारी प्रथिने शरीरास दोन मार्गांनी मिळतात. १)शरीरात ज्या पेशी मरतात. त्यांच्यापासून ७० ते८०टक्के मिळतात. २)बाकी २० टक्के प्रथिने ही आहारातून घेतली जातात. एका १०० ग्रॅम च्या अंड्यापासून १३ ग्रॅम प्रथिने मिळतात. जे लोकं प्रथिनांसाठी विशेषतः व्यायाम करणारे ५ पासून १५ पर्यंत अंडी खातात.ते किती प्रथिने आवश्यकते पेक्षा अधिक घेतात?त्या घेतलेल्या अतिरिक्त प्रथिनांचे(प्रोटीन) दुष्परिणाम काही काळाने शरीरावर होणारच. सामान्यतः अंडी उष्ण असल्याने उन्हाळ्यात आठवड्यातून १ ते २ वेळा १-२ अंडी खावीत. हिवाळ्यात तीन वेळा खावीत. अर्थात ते ही तुमच्या पचनशक्ती वर अवलंबून आहे.
शक्यतो अंडी कुणी खाऊ नयेत?
-मधुमेही
-मुतखडा व मूत्रपिंडाचा त्रास.
-मूळव्याध,भगंदर इ.गुदमार्गाने आजार.
– ज्यांचे कोलेस्टेरॉल जास्त आहे.
– हृदय विकार
– ज्यांना वजन कमी करायचे आहे. अशा लोकांनी शक्यतो अंड्यातील पिवळा भाग खाऊ नये.
– दमा, जास्त प्रमाणात अंडी खाल्यावर दमा होत असल्याचे दिसून येते.
अशा लोकांनी शक्यतो अंडी खाऊ नयेत. “संडे हो या मंडे ,रोज खाओ अंडे” म्हणायला चांगले आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच.
डॉ. अंकुश जाधव
प्रसिद्ध लेखक व सेवानिवृत्त सहायक संचालक, आयुष मंत्रालय, भारत सरकार.