आपण लोकशाही देश आहे. जगातील श्रेष्ठ लोकशाही भारतात आहे. लोकशाहीची आस्था आणि औसुक्य जगाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी लोकशाहीवर संकट आणू पाहत आहेत; अशी घणाघाती टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित चाकण येथील सभेत केली. यावेळी व्यवस्थेला बेधडक आव्हान देणारे अमोल कोल्हे संसदेत हवेतच असं म्हणत त्यांना विजयी करण्याचे आवाहन शरद पवारांनी केले आहे. कोल्हेंच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारचे उमेदवार आणि कामगार नेते शशिकांत शिंदे, धारिशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आदित्य शिरोडकर, माजी आमदार जयदेव गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, देशात येणाऱ्या सरकारकडे जगाचे लक्ष आहे. हा देश लोकशाही असलेला देश आहे. लोकशाहीवर मोदी आणि त्यांचे सहकारी संकट आणू पाहत आहेत. त्यांना घटना आणि संविधान बदलायचे आहे. यावेळी टीका व्हायला लागली त्यावेळी मोदी सांगू लागले आम्ही घटनेला हात लावणार नाही. घटना बदल्याण्यासाठी मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन भाजप नेते करीत आहेत. त्यासाठी 400 खासदार निवडून द्या. याचा अर्थ हा असा आहे की तुमच्या आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा डाव त्यांनी तयार केला आहे. त्यापासून आपण सावध भूमिका घेतली नाही तर भारताची लोकशाही धोक्यात जाण्याची भीती पवार यांनी व्यक्त केली.
काही पक्ष दखल घेण्यासारखे नाही – राऊत
Sharad Pawar मोदींची भाषा लाजिरवाणी
जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधीसह जे जे पंतप्रधान झाले त्यांच्या सभा आम्ही ऐकल्या आहेत, मात्र त्यापेक्षा लाजिरवाणी भाषा पंतप्रधान मोदी करीत आहेत. मोदी राज्यात येतात आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका करतात. मात्र आमच्या अंगाला टीकेमुळे भोके पडणार नाहीत. ते या ठिकाणी नाही त्या गोष्टी सांगतात. नव्या पिढीचा नेता राहुल गांधी पायी सर्व देशात फिरला. लोकांशी संवाद साधला, त्यांची दुःख समजून घेतली, त्यांची मोदी टिंगल करत आहेत. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, यांनी देशासाठी त्याग केला. मात्र त्याची नोंद घेणे सोडा, तर त्यांच्या बाबत वेडेवाकडे बोलले जात आहे, अशी टीका पवारांनी केली. शेतमालाला रास्त किंमत मिळालीच पाहिजे, प्रत्येकाला काम मिळाले पाहिजे स्रियांचा सन्मान झाला पाहिजे, त्यासाठी संसदेत अमोल कोल्हे यांच्या सारखे सुशिक्षित नेतृत्व जायला हवे. असंही पवार म्हणाले.
Sharad Pawar तुमचे मत थेट शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधींना
बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाचे, राज्याचे राजकारण भाजपने पूर्णपणे बिघडवले आहे. भाजपने महाराष्ट्राचे जास्त नुकसान केले आहे. मतदारावर आणि मतदानावर आघात होतो की काय अशी देशात परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाचे काय होणार अशी स्थिती आहे. बिघडवलेले राजकारण आपल्याला सुधारायचे आहे. अशा वेळी योग्य प्रतिनिधी आपल्याला संसदेत पाठवायचे आहे. अमोल कोल्हे यांना लोकसभेत पुन्हा पाठविण्याची जबाबदारी आपली आहे. राज्य आणि देश पुढे न्यायची आपली जबाबदारी आहे. आपले मत आदर्श लोकप्रतिनिधी अमोल कोल्हे यांना देत आहोत, ते थेट शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांना जाणार आहे, असे आवाहन थोरातांनी केले.