23.1 C
New York

Congress: शिवसेनेसोबत जाण्याने काँग्रेसची वाताहत झाली का?

Published:

मुंबई

काँग्रेसची (Congress) विचारधारा मानणारा एक मोठा वर्ग असला तरी कार्यकर्त्यांचे जाळं मात्र विस्कटलं गेलं आहे. देशावर सहा दशकांहून अधिक काळ राज्य करणारा हा पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतोय. काँग्रेसचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत सत्तेत सहभागी होणे पथ्यावर पडले की नुकसानदायी ठरले यावर मुंबई आऊटलुकचे मुख्य संपादक संजय मलमे यांच्याशी केलेली बातचीत…

सध्या काँग्रेसच्या स्थितीविषयी तुम्ही काय बोलाल?

सध्या काँग्रेस एका वाईट स्थितीतून जात आहे, हे येथे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. ग्रामपातळीवर अगदी वाडी-वस्तीपर्यंत कार्यकर्त्यांचे एक जाळं असणाऱ्या काँग्रेसकडे संघटन होतं, आजही काँग्रेसची विचारधारा मानणारा एक मोठा वर्ग असला तरी कार्यकर्त्यांचे जाळं मात्र विस्कटलं गेलं आहे, ही वस्तूस्थिती आहे. देशावर सहा दशकांहून अधिक काळ राज्य करणारा हा पक्ष आज विरोधी पक्ष म्हणूनही मान्यता मिळवण्यास पात्र नाही.

महाराष्ट्राच्या दृष्टीने काँग्रेसकडे कसे पाहता?

आपण जर महाराष्ट्राचा विचार केल्यास महाराष्ट्रावर नेहमीच काँग्रेस विचारांचा पगडा राहिला आहे. २०१४ पर्यंत युतीची १९९५ मधील युतीची साडेचार वर्षे सोडली तर येथे काँग्रेस विचारांचीच सरकार राहिली आहेत. त्याच काँग्रेसची आजची महाराष्ट्रातील स्थिती खूपच केविलवाणी आहे. शरद पवार यांच्या नादाला लागून शिवसेनेसोबत १०१९ मध्ये सरकारमध्ये जाणे काँग्रेसची खूप मोठी चूक होती. खरं त्याला सोनिया आणि राहुल गांधी तयार नव्हते. पण काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांना मध्यस्थी घालवून शरद पवार यांनी आपले ईप्सित साध्य करुन घेतले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी होऊन तसा काँग्रेसला काहीही लाभ झालेला नाही. किंबहुना काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष राजकारणाला यामुळे तडाच गेला आहे. शरद पवार हे पक्के धोरणी राजकारणी ते कधी कुठे कलंडतील याचा नेम नसतो. आज ज्या ज्याप्रमाणे राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, अगदी तसाच पाठिंबा २०१४ च्या निवडणूक निकालानंतर भाजपला देऊ केला होता. असो, सांगण्याचा उद्देश काँग्रेसचे नुकसान कसे झाले आहे, यावर आपण चर्चा करत आहोत.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडे कसे पाहता?

आज महाराष्ट्रातील चित्र पाहिल्यास लोकसभेच्या सर्व 48 जागा काँग्रेसने स्वबळावर लढवणे अपेक्षित होतं. पण तसं झाले नाही. भाजपला शह देण्याच्या नादात ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी आघाडी करून महाराष्ट्रातील आपले अस्तिव गमावून बसले आहेत. काँग्रेसचे पारंपरिक मतदार संघही त्यांच्या वाट्याला आले नाहीत. विजयाची खात्री असलेले सांगली, भिवंडी, हिंगोलीसारख्या मतदार संघावर काँग्रेसला पाणी सोडावे लागले. मुंबईत दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबईत काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे, या जागाही काँग्रेसला सोडून द्यावी लागली. काँग्रेसची एक निश्चित व्होटबँक आहे. स्वबळावर लढली असती तर कदाचित काही हक्काच्या जागा त्यांना जिंकता आल्या असत्या. एक राष्ट्रीय पक्ष अशी प्रतिमा असलेल्या काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 17 जागा आल्या आहेत. या उलट दोन शकले झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 21 जागा घेत आघाडीत एकप्रकारे काँग्रेसवर कुरघोडी केली आहे .

काँग्रेसचा देश पातळीवर विचार केल्यास तुम्हाला काय वाटते?

आज आपण संपूर्ण देशात वैचारिक पातळीवर विचार केल्यास भाजपला टक्कर देऊ शकते ती
म्हणजे एकमेव काँग्रेसच. भाजप आणि काँग्रेस दोनच पक्ष विचारधारेवर आधारलेले आहेत. इतरही पक्ष आहेत, जसे की कम्युनिस्ट, शेकाप वगैरे मात्र आज त्याचे अस्तित्व कुठे उरले आहे. प्रादेशिक पक्ष हे सोयीच्या राजकारणासाठी स्थापन झालेले आहेत. त्यामुळे ते तुम्हाला कधी काँग्रेस किंवा कधी भाजपसोबत सत्तेत सहभागी होताना दिसतील. अगदी बिहारमधील जेडीयू असो किंवा कर्नाटकातील जेडीएस असेल. तामिळनाडूतील अण्णा द्रमुक असेल अथवा आंध्रमधील तेलगू देशम असेल. बंगालमधील ममता असो किंवा उत्तरप्रदेशातील छोटे छोटे पक्ष सगळे सोयीचे राजकारण करताना दिसतात. त्याला शरद पवार यांचाही अपवाद नाही. काही गोष्टी त्या उघडपणे करत नाही, तोच काय तो फरक.

काँग्रेसची वाताहत नेमकी केव्हा झाली असे तुम्हाला वाटते?

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2004 ते 2014 या दहा वर्षांत संघटन पातळीवर काँग्रेस पक्षात मोठं दुर्लक्ष झालं. उलट सत्ता असताना पक्ष अधिक मजबूत करण्याची संधी होती. इथे मात्र सत्ता हीच काँग्रेसच्या पिछेहाट होण्यास कारणीभूत ठरली. काँग्रेसच्या संघटन पातळीवर बोलायचे झाल्यास 35 वर्षे मागे जावे लागेल. सन 1989 पासून काँग्रेसची वाताहत सुरू झाली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव बोफर्स प्रकरणात आल्याचा मोठा फटका बसला. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर 1984 मध्ये 414 अशा विक्रमी जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला 1989 च्या या निवडणुकीत 197 जागांवर समाधान मानावं लागलं. तसं पाहिल्यास काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी होती. सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष होता तरीही त्यांना विरोधात बसावं लागलं. 143 जागा जिंकणाऱ्या जनता दलाचे व्हीपी सिंह इतर पक्षांच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले. राजीव गांधी यांच्या निधनानंतर 1991 मध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेची संधी मिळाली. पण पूर्ण बहुमत नाही. त्यावेळी काँग्रेसला 227 जागा मिळाल्या होत्या. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी पन्नासभर जागांची गरज होती. इतर प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. राजीव गांधींच्या हत्येच्या धक्क्यामुळे गांधी कुटुंब यावेळी सत्ताकारणापासून दूर राहिलं. या काळात पक्षातील नेत्यांचा कुरघोडीच्या राजकारणामुळे संघटन पातळीवर मोठं दुर्लक्ष झालं. 1999 ला सोनिया गांधी सक्रिय झाल्या. पण शरद पवार यांची पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा जागृत झाली. त्यातून काँग्रेसमधून बाहेर पडले, तो सर्व घटनाक्रम आपल्या सर्वांना माहीत आहे. वास्तविक पाहिलं तर काँग्रेस पक्षाच्या बांधणीकडं सातत्याने दुर्लक्ष होत गेलं, नवीन पिढीला आकर्षित करण्यात काँग्रेस कमी पडली.

काँग्रेसला भवितव्य आहे का?
काँग्रेस हा विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेससाठी आज कठीण काळ असला तरी काँग्रेस नष्ट होईल असे नाही. काँग्रेसला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. काँग्रेसला प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. जेव्हा असे नेतृत्व उभे राहिल तेव्हा काँग्रेसने पुन्हा भरारी घेतलेली दिसेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img