मुंबई
लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) मुंबईत (Mumbai) पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde group) मुंबई उत्तर पश्चिम (Mumbai North West) मतदार संघाचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडल्यानंतर प्रथमच पक्ष सोडण्यास संदर्भातील मोठे वक्तव्य केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात त्यांनी धक्कादायक खुलासा केले आहे.
रवींद्र वायकर म्हणाले की, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात असताना मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आलं. त्यानंतर माझ्यासमोर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते. जड अंत:करणानेच मी पक्ष बदलला. नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये, असे रवींद्र वायकर म्हणाले.
माझ्या हातातील शिवबंधन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेपासून आहे आणि खांद्यावरचे शिवधनुष्यही. बाळासाहेबांच्या शिवसेनेत 50 वर्षे राहिल्यानंतर मला उद्धव ठाकरे यांची साथ सोडावी लागली, तेव्हा एखाद्या कुटुंबसदस्याला आपण पारखे होतो, तशीच माझी भावना होती. परंतु नियतीने माझ्यासमोर यक्षप्रश्न निर्माण करुन ठेवला व नियतीच कसा बदल घडवून आणू शकते, ते सर्वांनीच पाहिले आहे, असं वायकर यांनी म्हटलं.