दिवंगत बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi Kapoor) या हरहुन्नरी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जायच्या. ९० चं दशक त्यांनी खऱ्या अर्थाने कोणी गाजवलं असेल तर त्या श्रीदेवी होत्या. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईत त्यांचं निधन झालं. श्रीदेवींचे लाखो चाहते होते. त्याचं सौंदर्य, दमदार अभिनयाने त्यांनी सर्वांनाच घायाळ केलं होत. अशातच श्रीदेवी यांच्या स्मरणार्थ बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लोखंडवाला कॉम्प्लेक्स जंक्शनला श्रीदेवी यांचं नाव दिलं जाणार आहे. दिवंगत अभिनेत्रीला श्रद्धांजली म्हणून महापालिकेने लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळच्या एका जंक्शनला ‘श्रीदेवी कपूर चौक’ असं नाव देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
श्रीदेवी यांची अंत्ययात्राही याच रस्त्यावरून गेली होती. जंक्शनचे नाव त्यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय स्थानिक रहिवाशांच्या आणि नगरपालिकेच्या विनंतीवरून घेण्यात आला. त्यांच्याबदल असलेल्या समाजाचा आदर आणि प्रेम दर्शविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच श्रीदेवीच्या जीवनावर आधारित बायोपिकच्याही चर्चा रंगल्या आहेत. मात्र, त्यांचे पती बोनी कपूर यांनी अशा प्रकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले, “तिचं आयुष्य अतिशय खाजगी होत आणि ती एक खाजगी व्यक्ती होती. मला वाटतं तिला हे आवडणार नाही तीच आयुष्य जगासमोर आणलेलं.”
सलमान आणि रश्मिका पहिल्यांदाच दिसणार एकत्र!
दरम्यान, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ८०-९० च्या दशकात या ‘हवाहवाई’ने बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली होती. श्रीदेवी तामिळ सिनेमांमध्ये काम करत होत्या तेव्हाच बोनी कपूर त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण सिनेसृष्टी हादरून गेली होती. त्यांनी ‘चांदनी’ आणि ‘इंग्लिश विंग्लिश’ सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयामुळे केवळ भारतच नाही तर जगभरातील लाखो लोकांची मने जिंकली. श्रीदेवी कपूर चौकाचे नामकरण आणि त्यांच्या चित्रपटांची कायम लोकप्रियता यांसारख्या श्रद्धांजलींद्वारे, श्रीदेवीचा वारसा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक जिवंत भाग आहे.