नाशिक
नाशिकच्या (Nashik) राजकारणात मोठी खळबळ (MVA) उडवणारी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Elections) तिसऱ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार आहे. या टप्प्यातील प्रचार उद्या थंड होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार (Ajit Pawar) गटाचे नेते तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या संदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचार व्यासपीठावर चक्क नरहरी झिरवाळ बसलेले दिसणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या मतदारसंघातून महायुतीच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार रिंगणात आहे. तसंच, त्यांच्यासोबत शरदचंद्र पवार गटाचे नेते श्रीराम शेटे देखील उपस्थित आहेत. नरहरी झिरवाळ हे अजित पवार गटात असताना आज अचानक विरोधी उमेदवारासोबत व्यासपीठावर दिसल्याने ते महाविकास आघाडीसोबत जाणार अशी चर्चा आहे.
दिंडोरी तालुक्यातील तीसगाव येथे मारुती मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी हे सगळे नेते एकत्र आले होते. अक्षय तृतीया निमित्त तेथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे व अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ हेही सोबत असल्याने नरहरी झिरवाळांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्याची चर्चा झाली. मात्र, तसे काही नसून ते केवळ भूमीपूजन कार्यक्रमासाठीच एकत्र आले होते अशी माहिती समोर आली आहे.
दोन दिवसापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघात अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ महाविकास आघाडीच्या नेत्यांचे काम करत असल्याचा थेट आरोप केला होता तसेच जगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील कांदे यांनी केली होती. त्यानंतर आता नाशिक मधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात देखील अजित पवार गटाच्या नेत्याचे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर असल्याने जिल्ह्यात वेगवेगळी चर्चा रंगली आहे.