हैदराबाद
यंदा हैदराबाद (Hyderabad) मतदारसंघात हायहोल्टेज लढत होत आहे. येथील खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांना पराभूत करण्यासाठी भाजपने (BJP) जोरदार प्लॅनिंग केलं आहे. प्रखर हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता यांना तिकीट दिलं आहे. माधवी लता यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारासाठी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) हैदराबादला गेल्या होत्या. नवनीत राणा या भाजपाच्या (BJP) स्टार प्रचारक आहेत. येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत राणांनी ओवैसी बंधुंचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर घणाघाती टीका केली.
नवनीत राणा यांनी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या २०१२ मधील एका वादग्रस्त वक्तव्याचा दाखला दिला. छोटा म्हणतो की पोलिसांना पंधरा मिनिटं हटवा मग आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय करू शकतो. एक धाकटा आणि एक मोठा भाऊ आहे. त्यातला लहान भाऊ म्हणतो की, पोलिसांना 15 मिनिटांसाठी हटवलं तर आम्ही काय करू शकतो, हे दाखवून देऊ. त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की, तुम्ही 15 मिनिटं मागता. पण आम्हाला 15 सेकंद पुरेसे आहेत. पंधरा सेकंद पोलिसांना हटवलं अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दीन ओवैसी हे कळणार सुद्धा नाही की कुठून आले आणि कुठे गेले.
याआधी सन २०१२ मध्ये अकबरुद्दीन ओवैसीनं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी तो म्हणाला होता, की पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना हटवा मग आम्ही दाखवून देऊ की कुणात किती दम आहे. त्याच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाली होती. या प्रकरणात कोर्टाने त्याची सुटका केली होती. परंतु, ज्यावेळी निवडणुका येतात तेव्हा या वक्तव्याचा दाखला देत ओवैसी बंधूंवर टीका होत असते.
राणा पुढे म्हणाल्या, हैदराबादला पाकिस्तान बनण्यापासून रोखण्यासाठी ही निडणूक आहे. यावेळी तसंच मतदान करायचं आहे. आमची वाघीण माधवी लता यांना संसदेत पाठविण्यासाठी मतदान करायचं आहे. हैदराबादमधील सर्व हिंदूंना जागं करण्यासाठी मतदान करायचं आहे, असे नवनीत राणा या प्रचार सभेत म्हणाल्या. या सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.