मुंबई / रमेश औताडे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगूनही (Mumbai BEST) निवडणुकीनंतर बेस्ट बस सेवा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंत्राटदार ऐकत नसल्याने आम्ही पुन्हा आझाद मैदानात आंदोलन करणार आहे, त्यामुळे बस सेवा ठप्प झाली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशारा बेस्ट कंत्राटी बस चालकांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
बेस्ट परिवहन सेवेत कंत्राटी बस जास्त असून बेस्टच्या बसेस कमी आहेत. आमचे कंत्राटी वाहकांचे कामाचे तास व कामाची गुणवत्ता ही बेस्ट परिवहनच्या कायम कामगाराप्रमाणेच असताना वेतनात फरक आहे. आम्ही जिवंत वाहक आहोत की अदृश्य वाहक आहोत. १७ हजारात घर चालते का? आमचे कुटुंब मुंबईत एवढ्या कमी वेतनात कसे राहू सखते, असा संतप्त सवाल कंत्राटी बस चालकांचे प्रतिनिधी रघुनाथ यांनी यावेळी केला.
हेही वाचा : कोल्हेंच्या आरोपांना उत्तरे देत अक्षय आढळरावांचा प्रहार
सहा बस कंत्राटदारांच्या माध्यमातून बेस्ट परिवहन सेवेत आम्ही जनतेला सेवा देत आहेत. हे सहा कंत्राटदार गब्बर होत असताना आमच्यावर मात्र आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी लक्ष घालूनही कंत्राटदार ऐकत नसतील तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असे रघुनाथ यांनी सांगितले.
सुट्ट्या नाहीत, कामाची गॅरंटी नाही, मेडिकल सुविधा नाही, रजेचा पगार नाही, महागाई वाढली असताना १७ हजार वेतन मिळते, हे जगाच्या पाठीवरील वाहन चालकांचे एकमेव उदाहरण असेल, असे रघुनाथ यांनी सांगितले.
हेही वाचा : पवार काँग्रेस विचारांचेच, पृथ्वीराज चव्हाणांचे विधान