लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधी गटातील काही पक्षांची उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
या मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, येत्या दोन वर्षांत विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक जवळून काम करतील. यातील काही प्रादेशिक पक्ष आपले हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला. हाच निकष त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लावणार का, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले की, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फरक दिसत नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणीवर चालतो, असे शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग, गुन्हा दाखल
मात्र, प्रादेशिक पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेबाबत मी आत्ताच काही सांगू शकत नाही. माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळ आहे. पण, आमच्या पक्षाबाबत कोणतीही कृती किंवा रणनीती एकत्रितपणे घेतली जाईल. शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदींशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचवणे आमच्यासाठी कठीण आहे.
एका मोठ्या छत्राखाली येण्याची गरज
प्रादेशिक पक्षांबाबत शरद पवार यांचे विधान अनेक अर्थाने महत्त्वाचे मानले जात आहे. समाजवादी पक्ष, राजद, लोजप, वायएसआरसीपी, टीडीपी आणि भारत राष्ट्र समिती यांसारखे प्रादेशिक पक्ष जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे नेतृत्व हस्तांतरित करत असताना शरद पवार यांनी हे विधान केले आहे. या प्रादेशिक पक्षांसाठी हा स्थित्यंतराचा काळ आहे. स्थित्यंतर चालू असताना, अनेक प्रादेशिक पक्षांचे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपात किंवा घराणेशाहीच्या आरोपात अडकले आहेत. त्यामुळे या प्रादेशिक पक्षांना अस्तित्वाचा मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत या पक्षांना अस्तित्वाची लढाई लढता यावी यासाठी एका मोठ्या छत्राखाली येण्याची गरज आहे.
या मुलाखतीत शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरही भाष्य केले. एकत्र काम करण्याच्या या प्रस्तावाबाबत उद्धव ठाकरेही सकारात्मक असल्याचे शरद पवार म्हणाले. ते समविचारी पक्षांसोबत काम करण्यास तयार आहेत. त्यांची विचार करण्याची पद्धत मी गेल्या काही काळापासून अनुभवली आहे, ते आमच्यासारखेच आहेत, असे शरद पवार म्हणाले.