मोदी सरकार अदानींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लक्ष्य केले आहे. काँग्रेसला अदानी (Adani), अंबानींनी (Ambani) निवडणुकीत पैसे दिल्यामुळेच राहुल गांधी अंबानी, अदानींवर चकार शब्द काढत नसल्याचा आरोप मोदी यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदी बुधवारी तेलंगणाच्या दौऱ्यावर होते. करीमनगर येथे आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांचा थेट उल्लेख न करता मोदी म्हणाले, ” काँग्रेसचे शहजादे गेल्या पाच वर्षांपासून एकच आरोप करत आलेत. भाजपने अदानी आणि अंबानी यांच्यावर मेहेरबानी केली, असे ते म्हणत होते. राफेल प्रकरणात त्यांचे नाव आल्यानंतर यांनी हाच जप लावला होता. पाच उद्योगपतीच्या नावे त्यांनी टाहो फोडला. पण लोकसभा निवडणूक सुरु झाल्यापासून त्यांनी अंबानी-अदानींविरोधात ब्र सुद्धा काढला नाही.”
PM Modi : शिव्या देणे अचानक बंद का?
रोज सकाळी अदानी-अंबानींना शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या शहजाद्याने निवडणूक आल्यावर अचानक शिव्या देणे का बंद केले? काँग्रेसला अदानी, अंबानी यांच्याकडून किती रसद मिळावी, असा थेट गंभीर आरोप मोदींनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे. काँग्रेस अचानकच का गप्प बसली, याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे, असे आवाहन मोदींनी केले.
PM Modi : चंद्रशेखर रावही लक्ष्य
बीआरएस पक्षाचे चंद्रशेखर राव यांच्यावरही मोदींनी निशाणा साधला. “तेलंगणा राज्याची स्थापना होताना जनतेने भारत राष्ट्र समिती या पक्षावर विश्वास ठेवला. पण, बीआरएसने जनतेचा विश्वासघात केला. काँग्रेसनेदेखील हेच केले आहे. स्वातंत्र्यानंतर देश बुडाला तरी चालेल, पण कुटुंबाला झळ पोहोचली नाही पाहिजे, अशी काँग्रेसची भूमिका राहिली आहे. काँग्रेसला आणि या कुटुंबालादेखील काहीच फरक पडत नाही. माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांचा असाच अपमान या कुटुंबाने केला, असा आरोपही मोदींनी केला.