ओतूर,प्रतिनिधी : ( रमेश तांबे )
शाळेला सुट्टी लागल्याने,यात्रेनिमित्त आत्याच्या गावी आलेल्या चिमूरड्यावर बिबट्याने (Leopard Attack) हल्ला केल्याने,आठ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दि.8 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे काळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रूद्र महेंद्र फापाळे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या चिमूरड्याचे नाव आहे.याबाबत ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे अधिक माहिती देताना म्हणाले की,रूद्र फापाळे हा यात्रेनिमित्त काळवाडी येथे त्याच्या आत्याकडे आला होता.
पवारांनी दिलेले हे संकेत.. फडणवीसांचा गौप्यस्फोट
बुधवारी सकाळी रूद्र याचे आजोबा रोहिदास काकडे हे घराशेजारील शेतात गवत काढत असताना,रूद्र हा आजोबांच्या जवळच खेळत असताना,ऊसातून बिबट्या आला आणि त्याने चिमूरड्या रूद्र वर झडप मारून,त्याच्या मानेला पकडून शेजारील ऊसाच्या शेतात नेले.चिमूरडा रूद्र आजूबाजूला दिसत नसल्याने, त्याचवेळी त्याच्या नातेवाईकांना शेजारील ऊसाच्या शेतात आवाज ऐकू आला. पुढे जाऊन पाहिले असता,बिबट्या त्याच्यावर हल्ला करत असल्याचे दिसताच, त्यांनी आरडाओरडा करून चिमूरड्या रूद्र ला बिबट्याच्या तावडीतून सोडवले परंतु दुर्दैवाने वेळ निघून गेलेली होती. तीन दिवसांपूर्वीच दि.5 रोजी पिंपळवंडी लेंडेस्थळ येथे अश्विनी मनोज हुलवळे या महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असतानाच, येथून अवघ्या दीड ते दोन किलोमीटर अंतरावर ही दुसरी घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या वारंवार घटना घडत असून वनविभागाने बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशा तीव्र भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
बिबट्या किती लोकांचा जीव घेणार बस्स झाले, जनता आता खवळली आहे, जनतेचा उद्रेक झालेला आहे. आता पिंजरा नको, नसबंदी नको, आता सरकारने बिबट्या बाबत ठोस निर्णय घ्यावा किंवा बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश द्यावेत असा संताप व्यक्त करत श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर हे भावुक झाले.