23.1 C
New York

BJP : आज मतदान होणारे 93 मतदार संघ भाजपसाठी महत्वपूर्ण का?

Published:

नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तिसऱ्या टप्प्यात आज देशात 93 मतदार संघात निवडणूक होत आहे. 11 राज्यांत निवडणूक होत आहे. त्यात दमण दीव आणि दादरा नगर हवेली, गोवा या दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. या 93 जागांसाठी सुमारे 120 महिलांसह 1,300 उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक भाजपसाठी (BJP) किती आणि कशी महत्त्वाची आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, ज्योतिरादित्य सिंधिया आणि मनसुख मांडविया आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि दिग्विजय सिंह यांच्या भवितव्याचा निर्णय यात होणार आहे. याशिवाय पुरुषोत्तम रुपाला, प्रल्हाद जोशी आणि एसपी सिंग बघेल हे देखील या टप्प्यातील भाजपच्या प्रमुख उमेदवारांमध्ये आहेत.

ही निवडणूक भाजपसाठी किती आणि कशी महत्त्वाची आहे, किंबहुना भाजपाने जो 400 पारचा नारा दिला आहे, त्यात या 93 जागांवर भाजपची कशी मदार आहे, हेही जाणून जाणून घेऊ या. तत्पूर्वी कोणकोणत्या राज्यात कोण कोण दिग्गज निवडणूक लढताहेत यावर प्रथम एक दृष्टिक्षेप टाकू या. दुसरे एक वैशिष्ट्ये म्हणजे आज आपला हक्क बजावणाऱ्या मतदारांमध्ये 100 वर्षांवरील तब्बल 39 हजारांहून अधिक मतदार आहेत. मतदानाच्या या तिसऱ्या टप्प्यात 17.24 त्यात 8,39 महिला मतदार आहेत. 14.4 लाख मतदार 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत ज्यांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

93 जगांविषयीची आजची स्थिती पाहू या…

सुरत लोकसभेची जागा भाजपने बिनविरोध विजय मिळवल्याने गुजरातमधील उर्वरित 25 जागा, महाराष्ट्रातील 11 जागा, उत्तर प्रदेशातील 10 जागा, कर्नाटकातील 28 पैकी उर्वरित सर्व 14 जागांवर निवडणूक प्रक्रिया आज पार पडत आहे. छत्तीसगडमध्ये सात, बिहारमधील पाच, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी चार आणि गोव्यातील सर्व दोन जागांवर निवडणुका होत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाराष्ट्रात बारामतीतून सुप्रिया सुळे, रत्नागिरी- सिंधुदुर्गमधून नारायण राणे, साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसले या दिग्गजांचे भवितव्य आज मतयंत्रात बंद होणार आहे. यातील बारामतीची लढत खूपच लक्षवेधक ठरणार आहे. येथे प्रथम पवार कुटुंब एकमेकांविरुद्ध उभे टाकले आहेत. नणंद- भावजयमध्ये येथे सामना होत आहे.

कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी आजची निवडणूक लिटमस टेस्ट असणार आहे. एकेकाळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला असलेला कोकण 90 च्या दशकापासून शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. गेल्या 30 वर्षांपासून इथे एकच नारा गुंजतोय…आवाज कुणाचा… शिवसेनेचा ! त्याला 2009 चा अपवाद राहिला. त्यावेळी नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मागील दोन निवडणुकांत येथे शिवसेनेचे म्हणजे सध्याच्या उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत निवडून येत आहेत. या दोन्ही निवडणुकीत नीलेश राणेंचा पराभव झाला. या निवडणुकीची वैशिष्ट्ये म्हणजे राणे यांच्या मतांची दोन्ही निवडणुकीतील टक्केवारी 38 टक्केच होती. राऊत यांना 2014 ला 55 टक्केच्या आसपास मते मिळाली होती. 2019 त्यात पाच टक्क्यांनी घट झाली होती. त्यामुळे राऊत यांच्यापुढे मत शेअर कायम राखण्याचे आव्हान असणार आहे. यावेळी स्वतः नारायण राणे पुढे असल्याने राऊत यांच्यासाठी लढत चुरशीची असणार आहे.

तिसरा टप्पा दिवंगत मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबासाठीही महत्त्वाचा आहे. कारण त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्यासह कुटुंबातील तीन सदस्य रिंगणात आहेत. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव यांचा मुलगा अक्षय यादव फिरोजाबाद लोकसभा मतदारसंघ पुन्हा रिंगणात आहेत. सपाचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवपाल यादव यांचा मुलगा आदित्य यादव या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण करत आहे. 2014 मध्ये त्यांचे चुलत भाऊ धर्मेंद्र यादव यांनी प्रतिनिधित्व केलेल्या बुडौन मधून ते निवडणूक लढवत आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या भवितव्याचा फैसलाही आजच्या निवडणुकीत होणार आहे.

2019 चा विचार केल्यास या 93 जागांपैकी भाजप आणि मित्र पक्षांनी 75 जागा जिंकल्या होत्या

त्यापैकी 71 जागांवर एकटी भाजपा विजय झाली होती. सध्याच्या इंडिया आघाडीला यातील फक्त 8 जागा मिळाल्या होत्या. त्यातील काँग्रेसला केवळ चार जागा जिंकता आल्या होत्या. शिवसेनेचे चार आणि राष्ट्रवादीचे तीन उमेदवार निवडून आले होते. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष दुभंगले आहेत. हाही या निवडणुकीतील महत्त्वाचा फॅक्टर आहे. 2019 मध्ये तिसऱ्या टप्प्यातील 93 पैकी भाजपने एकट्याने जिंकलेल्या 71 जागांपैकी गुजरातमधून 25, मध्य प्रदेशमधून 9 आणि 14 कर्नाटकमधून होत्या.

छत्तीसगडमध्ये आज मतदान होत असलेल्या 7 जागांपैकी भाजपने 6 जागा जिंकल्या होत्या तर उत्तर प्रदेशात आज होणाऱ्या दहा जागांपैकी 8 जागांवर भाजपा विजयी झाला होती. महाराष्ट्रात आज मतदान होत असलेल्या 11 पैकी 4 जागा भाजपने जिंकल्या होत्या. आसाममध्ये भाजपला चारपैकी एक जागा जिंकता आली होती, तर बिहारमध्ये आज मतदान सुरू असलेल्या पाच जागांपैकी एक जागा भाजपने जिंकली होती. 2019 च्या निवडणूक निकालांनुसार आज झालेल्या पश्चिम बंगालमधील चार जागांपैकी भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती. दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात 2019 मध्ये भाजपने एक जागा जिंकली होती. 2019 मध्ये गोव्यात भाजपने एक जागा जिंकली होती तर काँग्रेसला एक जागा मिळाली होती. यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता तिसरा टप्पा भाजपसाठी किती महत्त्वाचा आहे, किंबहुना भाजपच्या विजयाचा मार्ग या 93 लोकसभा मतदार संघातूनच जातो, असेच म्हणावे लागेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img