7.8 C
New York

Ramesh Chennithala : मोदींना 200 पार करणेही मुश्किल- चेन्नीथला

Published:

मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भाजपचे (BJP) प्रचारक बनून 400 पारच्या घोषणा देत देशभर फिरत होते. पण मुळात 200 पार होणे सुद्धा त्यांना जड जाणार आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पाहता ही गोष्ट त्यांच्या सुद्धा लक्षात आली आहे. मोदी कार्ड महाराष्ट्रात चालेल, अशी अशा भाजपवाले बाळगून होते. पण ती पूर्णपणे फोल ठरलेली आहे. त्यामुळे मोदीजी आणि त्यांचे सहकारी हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान सारखे मुद्दे काढून देशामध्ये विभाजनाचे राजकारण करू पाहत आहेत. पण महाराष्ट्रातील सुज्ञ जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी आज मुंबईत केला.

महाविकास आघाडीचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भूषण पाटील यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री आमदार अस्लम शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान व चंद्रकांत हंडोरे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर, आमदार विलास पोतनीस, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरण सिंग सप्रा, काँग्रेसचे आमदार अमीन पटेल, माजी आमदार अशोकभाऊ जाधव, सचिन सावंत आदि उपस्थित होते.

रमेश चेन्निथला पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला पंतप्रधान मोदी भटकती आत्मा म्हणतात. देशाच्या पंतप्रधानपद भूषवत असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारचे वक्तव्य शोभा देते का ? या शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींना खडसावले. ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पंतप्रधान मोदी आणि त्यांचे लोक नकली शिवसेना म्हणतात. पण मोदीजी तुम्ही हे विसरू नका हे शिवसैनिक कर्मठ शिवसैनिक आहेत. हे शिवसैनिक आणि इथली शिवसेना तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यांच्याकडे दुसरे कोणते मुद्दे नाहीत म्हणून ते फोडाफोडीचे आणि विभाजनाचे राजकारण करत आहेत. धर्माधर्मांमध्ये भेद निर्माण करून भांडणे लावायचे काम आपल्या भाषणांमधून पंतप्रधान मोदी आणि त्यांचे नेते करत आहेत. पण ते आदरणीय शरद पवारांबद्दल, शिवसेनेबद्दल कितीही बोलले. तरी फरक पडणार नाही कारण महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या सोबत आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचे आमचे लक्ष आहे. मुंबईमध्ये देखील सहाच्या सहा जागा आम्ही जिकू, अशी मला पूर्ण खात्री आहे.

यावेळेस बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपने उत्तर मुंबईमध्ये उभे केलेले पेडर रोडचे पार्सल परत पेडर रोडला पाठवून येथील भूमिपुत्र भूषण पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावे, असे आवाहन मी उत्तर मुंबईच्या जनतेला करत आहे. भाजप प्रचार रॅलीदरम्यान कोळीवाड्यांमध्ये फिरताना भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार हे नाकाला रुमाल लावून फिरतात. इतकी त्यांना त्यांची घाण वाटते. मासेमारी करणे, हा येथील कोळीवाड्यांमध्ये राहणाऱ्या कोळी बांधवांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे. हे कोळी बांधव येथील मूळ भूमिपुत्र आहेत आणि या भूमिपुत्रांची आणि त्यांच्या व्यवसायाची भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांना घाण वाटते. हे नाकाला रुमाल लावून फिरतात. मग हे त्या भूमिपुत्रांच्या समस्या कसे सोडवणार. हा त्या भूमिपुत्रांचा अपमान आहे. महाराष्ट्रात जर तुमच्या नाकाचे केस जळत असतील तर तुम्ही गुजरातला जाऊन निवडणूक लढवा. महाराष्ट्रात निवडणूक लढवायचा त्यांना अधिकार नाही. म्हणून हे पार्सल आपल्याला लवकरच पेडर रोडला पाठवायचे आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img