लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. यापैकी महाराष्ट्रात 11 जागा आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naraendra Modi) यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी अहमदाबादला जाऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडले. नरेंद्र मोदींनी निशान पब्लिक स्कूलमध्ये जाऊन मतदान केले. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांनीही मतदानाचे कर्तव्य बजावले. मतदानानंतर मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला.
जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडून मतदानाचे कर्तव्य बजावावे, असे आवाहन मोदींनी जनतेला केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही दिला. या उन्हात तुम्ही लोक रात्रंदिवस फिरत आहात. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सध्या माध्यमांमध्ये खूप स्पर्धा आहे. आज इकडे तिकडे पळावे लागेल, असे सांगून त्यांनी भर उन्हात स्वत:ची काळजी घ्या आणि जास्तीत जास्त पाणी प्या, असा सल्ला दिला.
आज मतदानाचा तिसरा टप्पा आहे, मी देशवासियांना आवाहन करेन की लोकशाहीत मतदान करणे म्हणजे दान आहे , आपल्या देशात या दानाला विशेष महत्व आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे. मी नियमितपणे मतदान करतो. मी काल रात्री आंध्रहून आलो. सध्या गुजरातमध्ये आहे, अजून मध्य प्रदेशात जायचे आहे. त्यांना तेलंगणालाही जायचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.