मुंबई
मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात रस्त्यावरील पदार्थ खाल्याने सुमारे 50 जणांना विषबाधा (Food Poisoning) झाली, त्यात प्रथमेश भोकसे (15) या मुलाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गोरेगाव येथे रोडवर विक्री करण्यात येणारा चिकन शोरमा खाल्याने 10 ते 12 जणांना विषबाधा झाल्याची घटना 26 एप्रिल रोजी घडली होती. त्यानंतर ही घटना घडल्याने मुंबईतील स्ट्रीट फुडविषयी (Street Food) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरातील हनुमान चाळीजवळ फेरीवाल्याकडून पिझ्झा बर्गर काही जणांनी खाल्ले. त्यांनतर काही वेळातच त्यांना पोटात मळमळणे, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्या सर्वांना जवळच्या खासगी रुग्णालयात, तर काहींना पालिकेच्या गोवंडीतील शताब्दी, सायन, केईएम रुग्णालयात दाखल केले. यापैकी काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. प्रथमेश भोकसे या मुलाला याच मानखुर्दच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान तेथे त्याचा मृत्यू झाला. ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.