शंकर जाधव, डोंबिवली
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. केळी विक्री करणाऱ्या विक्रेतेच्या सक्रियतेमुळे पोलिसांनी नकली नोटा चलनात (Fake Currency) आणणाऱ्या व्यक्तीला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी (Kalyan Police) अटक केली आहे. आरोपी व्यक्तीकडून 13 हजाराच्या नकली नोटा जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश सिंह अटक केलेल्याचे नाव असून तो दिल्लीत रॅपिडो बाईक चालवितो. अंकुश हा मुंबईत आपल्या नातेवाईकाकडे आला होता. पुन्हा दिल्ली जात असताना त्याने कल्याण स्टेशनवर केळी विक्रेत्याला 500 ची नकली नोट दिली. केळी विकत घेऊन त्याने उरलेले पैसे घेतले. मात्र केळी विक्रेत्याला संशय आला कि अंकुशने दिलेली 500 रुपयांची नोट नकली असावी. केळी विकेत्याने ही माहिती महात्मा फुले पोलिसांना दिली. पोलिसांनी अंकुशचा शोध घेतला. पोलिसांनी अंकुशला अटक करून त्याच्याकडून १३ हजाराच्या नकली नोटा जप्त केल्या. त्यात १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नकली नोटांचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या नोटा दिल्लीमधील एका व्यक्तीने बाजारात चालवण्यासाठी दिल्या होत्या या सर्व नोटा चालवल्या नंतर त्याला दहा हजार खऱ्या नोटा बद्दल पंचवीस हजाराच्या नकली नोटा देणार असल्याचे त्यांनी पोलिसाला सांगितले.