मुंबई
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) 11 लोकसभा मतदारसंघांवर तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. या दरम्यान बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघाच्या शरद पवार गटाच्या (Sharad Pawar group) उमेदवार सुप्रिया सुळे ( (Supriya Sule) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांची भेट घेतली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. यावरून अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सोशल मीडिया वरून सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
यावर अमोल मिटकरी यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात म्हटले आहे की, खा.सुप्रियाताई आत्ताच दादांच्या आई म्हणजे आशाताई पवार यांना काटेवाडी या त्यांच्या गावी भेटायला गेल्याची बातमी प्रसार माध्यमांद्वारे कळली. निवडणुकीच्या रणधुमाळीत गेल्या दीड महिन्यापासून आशाताई बारामती परिसरातच आहेत. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. बारामतीत पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकमेकांविरोधात निवडणुकीत उभे राहिल्याने या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आज सकाळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.