Share Market : हर्ष गोयंकांच्या पोस्टने खळबळ
शेअर बाजारात (Share Market) हर्षद मेहता (Harshad Mehta) आणि केतन पारेख (Ketan Parekh) प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात काही कंपन्यांचे शेअर मूल्य अवास्तव वाढताना दिसत आहे. या कंपन्यांचा नफा फारसा नसतानाही तो दाखवला जात आहे. पण, यामुळे शेअर बाजारात एक फुगा निर्माण झाला असून तो फुटल्यास सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान होणार आहे, अशी पोस्ट प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर टाकली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
Share Market : शेअर्सच्या किमतीशी छेडछाड
आरपीजी समूहाचे प्रमुख हर्ष गोयंका यांनी शेअर्सच्या किंमतीमध्ये छेडछाड केली जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. शेअर बाजारात दिसणारी तेजी अवास्तव आहे. ही तेजी पाहून हर्षद मेहता आणि केतन पारेख प्रकरणाची आठवण येते. त्यावेळीही असेच कंपन्यांचे शेअर्स अवास्तव वाढवले गेले होते. त्यामुळे बाजारात तेजी आली होती. सामान्य गुंतवणूकदारांनी बाजारात पैसा टाकला आणि बाजार वास्तव स्थितीला आल्यावर गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.
आताही बाजारात हीच स्थिती आहे, असे म्हणत हर्ष गोयंका यांनी म्हंटले आहे की, बाजारातील प्रमोटर काही विशिष्ट कंपन्यांचा नफा वाढवून दाखवत आहेत. हे सारे गुजराती-मारवाडी ब्रोकरांना हाताशी धरून घडवले जात आहे. पण, सामान्य गुंतवणूकदारांच्या हितासाठी सेबी आणि अर्थ मंत्रालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही गोयंका यांनी केली आहे.
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर हर्ष गोयंका यांनी ही पोस्ट टाकली होती. 3 मे रोजी सेन्सेक्स जवळपास १००० अंकांनी घसरून ७४ हजाराच्या खाली पोहोचला होता. निफ्टीतही २०० अंकांनी घसरण झाली होती. शेअर बाजाराला लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तांतर होण्याची भीती वाटत आहे. सत्ताबदल झाल्यास कररचनेतही बदल होण्याचा धोका आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहे. हर्ष गोयंका यांच्या या पोस्टवर मात्र अनेकांनी टीका केली आहे. हर्ष गोयंका गुजराती आणि मारवाडी समाजाबाबत चुकीची विधाने करून भीती निर्माण करत आहेत, असे अनेकांनी म्हंटले आहे.