पुणे
चीनमधील शक्सगाम खोऱ्यात घुसखोरी सुरू आहे. असे असताना आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचे वक्तव्य आले आहे की, तेथील लोक भारतात यायला तयार आहेत. हे प्रचंड मोठे फसवे वक्तव्य आहे. सियाचीनला लागून असलेल्या शक्सगाम खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भारतविरोधी कारवाया सुरू झाल्या आहेत आणि त्या लोकांसमोर येऊ नये म्हणून संरक्षण मंत्र्यांनी खोटे विधान केले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी मी सगळ्यात मजबूत नेता आहे आणि देशाचे नेतृत्व मी कुशलतेने करू शकतो असे वक्तव्य केले आहे. पण त्यांच्या 10 वर्षांच्या काळातील परदेशी धोरणाचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की, त्यांनी सामान्य माणसांसाठी धोरण आखले नाही. भारताचा जो दबदबा होता, एकंदरीत परदेशी संदर्भातला तो कमी झाला आहे. नेपाळसारखे राज्य हे सुद्धा भारताला आव्हान द्यायला लागले आहे. नेपाळची नवीन शंभर रुपयाची नोट आलेली आहे त्यामध्ये उत्तराखंडमधील पितोडगा जिल्ह्यातील तीन प्रदेश त्यांचे म्हणून दाखवले गेले असल्याचेही आंबेडकर यांनी नमूद केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मध्यंतरी मालदीवसारख्या देशाबरोबर वैयक्तिक संघर्ष झाल्याने त्यांनी तिथली पर्यटन व्यवस्था पूर्णपणे बंद केली आहे. मदत बंद केली आहे. त्यांच्याविरोधातील भूमिका भारताने घेतल्यानंतर आमच्या माहितीप्रमाणे 250 सैन्य अधिकारी माघारी पाठवले आहेत. उरलेल्यांना घेऊन जायला सांगितले आहे.यासंदर्भात आम्ही सरकारकडून स्टेटमेंटची अपेक्षा करत आहोत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान प्रशासन आहे. बांगलादेशसोबत आपले संबंध पुन्हा बिघडायला लागले आहेत. पाकिस्तान चीनच्या ताब्यात गेले आहे, श्रीलंका चीनच्या ताब्यात जाण्याच्या वाटेवर आहे असे आपल्याला दिसते. भूतान असा एकच प्रदेश आपल्यासोबत राहिल्याचे दिसते.ऑस्ट्रेलिया, युनायटेड नेशन, इंग्लंड, जर्मन किंवा फ्रान्स हे आपल्यासोबत जिव्हाळ्याने वागत होते, त्यांनी आता अंतर ठेवायला सुरुवात केली आहे. त्यांना असे वाटत आहे की, आपली भूमी आपले स्वायत्त हे इथले इंटेलिजेंट डिपार्टमेंट वापरत आहे का? तेथील नागरिकांना गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत. भारताच्या विरोधात भूमिका घेत होते याबाबत दुमत नाही, पण त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. यामध्ये या सरकारचा हात आहे का? अशी शंका यायला लागली आहे म्हणून ही राष्ट्रे अंतर ठेवत आहेत.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण तेल फक्त रशियाकडून विकत घेत आहोत. पॅलेस्टाईन आणि इस्रायल संदर्भातली आपली तटस्थ भूमिका होती. त्या भूमिकेशी नरेंद्र मोदी आणि आरएसएस यांनी तडजोड केली. त्यामुळे मध्य आशियामधील राष्ट्रांनी सुद्धा आता अंतर ठेवून वागायला सुरुवात केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कुवैत आणि दुबईमध्ये भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तिथे आता भूमिका घ्यायला लागले आहेत की, एका राष्ट्राचे किती लोक आपल्या देशात असावेत याचा कायदा करावा. भाजप सरकार 2024 मध्ये पुन्हा आले, तर आम्हाला भीती आहे की, स्थलांतर कमी करण्याच्या नावाखाली स्वतःच्या देशामध्ये असा कायदा करतील. याचे गुणोत्तर जर त्यांनी जाहीर केले, तर याचा फटका भारतीयांना बसणार आहे. मध्यमवर्गीयांनी विचार करावा आणि या निवडणुकीत त्यांना उत्तर द्यावे. आम्ही असे बघत आहोत की, भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर आयसोलेशन होत असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना युनायटेड नेशनने बंदी घातली आहे ती बंदी उठलीय का? याचे उत्तर त्यांनी द्यावे. पंतप्रधान म्हणून त्यांना स्वीकारावे लागते, पण वैयक्तिक नरेंद्र मोदी यांच्यावरील बंदी उठलीय का याचा खुलासा करण्याचे आवाहन त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत मोदींना अपयश आलेलं आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, या अपयशाचे कारण मोदी एवढेच सांगतात की, मी ॲपवर बंदी घातली. पण त्या ॲपला ऑपरेट करणाऱ्या कंपन्यांवर तुम्ही बंदी घातलीय का? तर ती ताकद भाजपकडे नाही. अनेक चायनीज कंपन्यांनी इलेक्ट्रोल बाँड विकत घेतलेले आहेत आणि भाजपच्या तिजोरीत टाकले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोदी प्रेमातून बाहेर पडा, धार्मिकतेतून बाहेर पडा आणि आयुष्यभर आपण सीमांचे संरक्षण केले आहे ती आता धोक्यात आलेली आहे हे मांडायला सुरू करा असे आवाहन त्यांनी सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांना केले.