रमेश तांबे, ओतूर
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी (लेंडेस्थळ) शिवारात शेतात खुरपणीचे काम करत असलेल्या महिलेवर रविवारी दि. 5 रोजी सायंकाळच्या सुमारास बिबट्याने झडप मारून महिलेला शेजारील ऊसाच्या शेतात ओढत नेले, दरम्यान आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा करून सदर महिलेला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. मात्र सदर महिला ही बिबट्याच्या (Leopard Attack) हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नारायणगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अश्विनी मनोज हुलवळे वय २४ वर्ष, मूळ राहणार बोटा (आंबेठाण) ता. संगमनेर जि.अहमदनगर, सध्या राहणार पिंपळवंडी ( लेंडेस्थळ ) ता.जुन्नर असे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती देताना ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे म्हणाले की, रविवार दि.५ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या समारास अश्विनी हुलवळे ह्या पिंपळवंडी लेंडेस्थळ येथील शेतकरी भाऊसाहेब सदाशिव लेंडे यांच्या शेतात कोबी पिकाच्या खुरपणीचे काम करत असताना, बिबट्याने अश्विनी यांच्यावर पाठीमागून झडप मारून,मानेला पकडून शेजारील ऊसाच्या शेतात ओढत नेले, त्याचवेळी बाळासाहेब लेंडे, अशोक हुलवळे, पद्माकर लेंडे या नागरिकांनी आरडाओरडा करून सदर महिलेला बिबट्याच्या तावडीतून सोडविले.दरम्यान अश्विनी हुलवळे या महिलेच्या तोंडाला,डोळ्याला,मानेला व तिच्या श्वासनलिकेला गंभीर दुखापत झाली असल्याने,तिच्यावर नारायणगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने घटनास्थळी दहा पिंजरे लावले असून बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी आठ ट्रॅप कॅमेरे तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने सर्वेचे काम सुरू असून, घटनास्थळी रेस्क्यू टीम व वनविभागाचे ३० कर्मचारी रात्रंदिवस गस्त घालत असल्याचे श्री काकडे यांनी सांगीतले.
[ पिंपळवंडी लेंडेस्थळ येथील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागते, यातच बिबट्याचे दैनंदिन दर्शन होत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने दिवसा किमान आठ तास लाईट द्यावी.
———- रघुनाथ लेंडे
माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर ]