रमेश औताडे, मुंबई
राजकारणाशिवाय दुसरे इतर विषय ही महत्वाचे आहेत. प्राधान्य कशाला द्यावे याचे भान अपवाद वगळता काही मालक, संपादक पत्रकार विसरत चालले आहेत. अनेक पत्रकारांना भूगोल, इतिहास, समाजशास्त्र याचे आकलन नाही. यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करून देण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर (Vijay Kuvlekar) यांनी महाराष्ट्र संपादक परिषदने (Maharashtra Editors Council) आयोजित केलेल्या पत्रकारिता गौरव आदर्श साहित्य पत्रकारिता सन्मान पुरस्कार २०२३ सोहळ्याच्या वेळी व्यक्त केले.
शनिवार ४ मे रोजी मुंबईतील दादर- माटुंगा कल्चरल सेंटर, जे. के. सावंत मार्ग, माटुंगा पश्चिम येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र संपादक परिषदेचे संस्थापक स्व. यशवंत पाध्ये यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार यमाजी मालकर, प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ संपादक विजय कुवळेकर आणि जेष्ठ नाटककार सुरेश खरे उपस्थित होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे आणि जेष्ठ साहित्यिक रवींद्र आवटी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी केले, तर आभार परिषदेचे अध्यक्ष तसेच मुंबई आऊटलूक मीडिया हाऊसचे मुख्य संपादक संजय मलमे यांनी आभार मानले.
पत्रकारिता साहित्य गौरव पुरस्काराने झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार, दैनिक ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, दैनिक संध्याकाळच्या संपादिका रोहिणी खाडिलकर, आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी महेश तिवारी, एबीपी माझाच्या ज्ञानदा कदम, पुण्य नगरी – ठाणेचे निवासी संपादक हेमंत जुवेकर, महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी वैभव वझे, सीएनएन न्यूज १८ च्या ब्युरो चीफ विनया देशपांडे (पंडित), मराठवाडा साहित्य संमेलन २०२३ चे माजी अध्यक्ष जगदीश कदम, दैनिक सकाळचे नाशिकचे उपसंपादक महेश माळवे यांना गौरविण्यात आले.
साप्ताहिक लोकवृत्तान्त चे संपादक एकनाथ बिरवटकर, जेष्ठ साहित्यिक रवींद्र आवटी, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील आनंदराव (दादा) माईगडे, लोककला शाहीर रुपचंद चव्हाण यांना यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था कोणत्याही संघटनेशी समांतर किंवा स्पर्धात्मक कार्य न करता पत्रकारितेच्या उद्दिष्टांसाठी कार्यरत राहणारी संस्था आहे. ही संस्था म्हणजे संपादक-मालक प्रामुख्याने दैनिकांचे व त्यांनी नामनिर्देशित केलेले प्रतिनिधी यांची संघटना आहे. ही संस्था ध्येयासक्त, पारदर्शी आणि विश्वासार्ह आदर्श पत्रकारितेसाठी वचनबद्ध असेलेली संस्था आहे. ही संस्था मराठी भाषा, संस्कृती व अस्मितेशी वचनबद्ध असून, या संस्थेने वाचन संस्कृतीचे संवर्धन व ग्रंथालय चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. विविध प्रसार माध्यमांशी अनुबंध निर्माण करून त्यांच्या सहयोगातून लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकजागृती यांसाठी सहभाग घेणे, पत्रकारांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविणे, पत्रकारिता आणि साहित्य यांचा अनुबंध राखणे आणि नैसर्गिक आणि आपदग्रस्त पत्रकारांसाठी साहाय्य करणे हे महाराष्ट्र संपादक परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट राहिलेले आहे. तसेच या संस्थेतर्फे दर दोन वर्षांनी आदर्श पत्रकारिता गौरव पुरस्कार योजनेमधून राज्यस्तरीय मानवंत व गुणवंत पत्रकारांचा सन्मान केला जातो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुसंवादिनी शिवानी जोशी यांनी केले.