पुणे : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईच्या (CBSE) दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत सध्या समाज माध्यमांवर अफवांचे पेव फुटले आहे. याबाबतची काही बनावट परिपत्रकेदेखील समोर आली आहेत. यावर सीबीएसईने आपल्या संकेतस्थळावर माहिती देत दहावी, बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख जाहीर केली आहे.
CBSE : निकालाविषयी अनेक अफवा
यावर्षी सीबीएसईने १५ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत बारावीची तर १५ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेतली आहे. विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. सध्या समाजमाध्यमांत निकालाच्या तारखेचा उल्लेख असलेली बनावट परिपत्रके प्रसिद्ध केली जात आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दहावी आणि बारावीच्या निकालाविषयी माहिती दिली आहे.
दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचे निकाल 20 मेनंतर लागतील, असे सीबीएसईने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे. सीबीएसईचे संकेतस्थळ https://results.cbse.nic.in/ येथे मंडळाने एक संदेश प्रसारित करत हि माहिती दिली आहे.