मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या वतीने जाहिरात करण्यात आली होती. ठाकरे गटाकडून प्रसारित करण्यात आलेल्या एका जाहिरातीमध्ये पॉर्नस्टार (porn star) अभिनेता असल्याचे भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला होता. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलेल्या आरोपाला अभिनेता राज नयानी (Raj Nayani) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राज नयानी म्हणाले की, मी एक चारित्र्यवान कलावंत असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पॉर्न स्टारची उपमा देऊन माझा अपमान केला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत त्यांनी माझी माफी मागावी. अन्यथा अब्रुनुकसानी दावा दाखल करणार असा इशारा अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी दिला आहे.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ एक सुशिक्षित महिला आहेत. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमांत किंवा मालिकेत काम करतो, तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते. त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो. हे त्यांना माहीत असावे असंही राज नयानी यांनी म्हटलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीत मी काम केले आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांनी राजकीय सूडबुद्धीने माझा उल्लेख पॉर्न स्टार म्हणून केला आहे. त्यांनी दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर मी अब्रूनुकसान केल्याचा दावा कोर्टात दाखल करेन”, असा इशाराही राज नयानी यांनी दिला आहे.