गुन्हेगार गोल्डी ब्रारची (Goldy Brar) अमेरिकेत हत्या झाल्याचे वृत्त काल सर्वच माध्यमांवर झळकत होते. गोल्डी ब्रार हा भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moosewala) हत्येमागे गोल्डी ब्रार हा मास्टरमाईंड आहे. गोल्डी ब्रारच्या हत्येच्या बातमीने भारतात विविध चर्चांना उधाण आले. आता या प्रकरणातील सत्य बाहेर आले आहे. अमेरिकेत काळ हत्या झाली हे खरं असलं तरी हत्या झालेली व्यक्ती ही गोल्डी ब्रार नसून इतरच कोणीतरी आहे.
स्वत:ला वाचवण्यासाठी त्याने अंदाधुंद गोळीबार केला
ठार झालेली व्यक्ती मूळची आफ्रिकन आहे. या व्यक्तीचा मृतदेह तेथून जात असलेल्या एका पंजाबी व्यक्तीला दिसला आणि त्याला वाटले की तो गोल्डी ब्रार आहे. याप्रकारानंतर गोल्डी ब्रारची हत्या झाल्याची अफवा पसरली. स्थानिक वेबसाइट फॉक्सने सर्वप्रथम हत्येची माहिती दिली. पण त्यांनी गोल्डी ब्रारचे नाव लिहिले नाही. त्याआधारे भारतीय माध्यमांनी ही बातमी गोल्डी ब्रारशी जोडली आणि त्यांची हत्या झाल्याची बातमी चालवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील फेअरमाँट आणि होल्ट अव्हेन्यू येथे मंगळवारी संध्याकाळी 5.25 च्या सुमारास आफ्रिकन लोकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. एक जण खाली पडला. स्वत:ला वाचवण्यासाठी त्याने अंदाधुंद गोळीबार केला. दोघांच्या पोटात आणि छातीत गोळ्या लागल्या.
मृत्यू झालेल्या दोघांपैकी एक गोल्डी ब्रारसारखा दिसत होता. तेव्हा तेथून जाणाऱ्या एका पंजाबी माणसाने गोल्ही ब्रार मारल्याची अफवा पसरवली. इतकेच नाही तर गोल्डी ब्रारच्या हत्येसाठी भारतीय मीडियाने प्रतिस्पर्धी टोळी अर्श डल्ला आणि लखबीर यांना जबाबदार धरले. डल्ला गँगने फेसबुकवर या हत्येची जबाबदारीही घेतली होती.
कॅलिफोर्नियातील भारतीय वाणिज्य दूतावासातील अधिकाऱ्याने गोल्डीच्या हत्येमागील तथ्य जाणून घेण्यासाठी अमेरिकेतील फ्रेस्नो पोलिसांशी संपर्क साधला. याबाबत पोलिसांनी भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांना काय सांगितले? हे अजून समजलेले नाही. खून झाला तो परिसर पोलिसांनी सील केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गोल्डी ब्रार हा सिद्धू मूसवाला हत्याकांडातील मुख्य संशयित म्हणून पंजाब पोलिसांना तसेच इतर राज्यांच्या पोलिसांच्या रडारवर आहे. काही महिन्यांपूर्वीच गोल्डी ब्रारला केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याचं मान्य केलं होतं. 2022 मध्ये पंजाबमधील एका विद्यार्थी नेत्याच्या हत्येचा बदला म्हणून मुसेवालाच्या हत्येचा कट रचल्याचे त्याने सांगितले होते. गोल्डी नेमकं कुठे आहे हे सध्या तरी माहीत नसल्याचे समोर येत आहे.