21 C
New York

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

Published:

सातारा

देश मोठा की अहंकार मोठा ? माझ्या दृष्टीने देश हा मोठा असतो आणि आपला अहंकार लहान असतो. आपण पाहत असाल की, आपले पंतप्रधान आपला अहंकार आधी ठेवतात आणि देशाला पाठीमागे ठेवतात अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर केली. सातारा लोकसभेचे (Satara Lok Sabha) उमेदवार माजी सैनिक प्रशांत कदम यांच्या प्रचार सभेत आंबेडकर बोलत होते.

आगामी काळात धोके मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. अशा परिस्थितीत अधिकारी आणि सैनिक यांच्यात जिव्हाळ्याचे नाते असले पाहिजे. या नात्याला आता तडा जात आहे, असे मला अनेकजण सांगतात. आपण मतदानाच्या माध्यमातून शांतीपूर्ण बदल करावा असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, सध्याचे सरकार हे जुमलेबाज सरकार आहे. पहिल्यांदा 15 लाखाचा जुमला केला. नंतर सांगितले 2 कोटी रोजगार देऊ. पण दरवर्षी 12 लाख नोकऱ्या कमी होत आहेत, तिथेही या सरकारचे अपयश आहे. ज्या पंतप्रधानाला माणसांबद्दल जिव्हाळा नाही, त्याला पंतप्रधान करणे हा आपला गुन्हा आहे हे लक्षात घ्या. 10 वर्षे भाजपची सत्ता आहे, या दहा वर्षांत भाजपने धर्माच्या नावाने द्वेष पेरला आहे. समाजात फूट पाडण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे.

जे काम आर्मीने ईशान्य भारतात केले आहे. तेथील लोकांना आपल्यासोबत राहायचं नाही अशी भावना तिथे होती. 20 ते 30 वर्षे आर्मी तिथे राहिली, त्यांनी तिथे संबंध जोडले. त्यांची भावना पूर्णपणे बदलली. आज ते म्हणत आहेत की, आम्हाला भारतासोबत राहायचं आहे. त्यांना जोडण्याचं काम आर्मीने केले. मणिपूरच्या घटनेमुळे जुळलेली मने दुभंगली असल्याची खंत देखील त्यांनी या वेळी बोलून दाखवली.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बोलत असताना आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने मराठा आणि ओबीसींमध्ये मध्यस्थी केली नसती, सामंजस्याची भूमिका घेतली नसती, तर युद्धासारखी परिस्थिती होती. त्यावेळी इथले राजकीय नेतृत्व कोणत्या बिळात बसले होते कोणाला माहिती ?

भाजपसोबत त्यांनी काँग्रेसचाही समाचार घेतला. भाजपचे राजकारण द्वेषावर आधारित आहे. 10 वर्षांच्या कालावधीत त्यांनी एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. हळूहळू काँग्रेससुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. मुस्लिम समाज आणि जैन समाज यांना उमेदवारी द्यायची नाही ही भाजपची भूमिकाच आता काँग्रेस घेत असल्याची टीका आंबेडकर यांनी काँग्रेसवर केली.

आम्ही वंचितांचे राजकारण करत आहोत. उपेक्षितांचे राजकारण करत आहोत. समाजाने बहिष्कृत केलेल्यांचे राजकारण करत आहोत. मुंबईसारख्या शहरात मोदीना उत्तर देण्यासाठी ६ पैकी 3 मुस्लीम उमेदवार दिले असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. त्याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की,  समाजातील सामंजस्य राहिले पाहिजे.

बँकेतील खातेदाराचे 12 लाख कोटी डूबले आहेत. हे डूबायला लावणारे गुजराती लोक आहेत. तरीही एकातरी गुजराती माणसावर धाड पडली आहे का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. दिल्ली राजधानी असताना आंतरराष्ट्रीय कार्यक्रम इथे झाले नाहीत यावर त्यांनी उपस्थितांना प्रश्न विचारले. ते म्हणाले की, दिल्ली ही राजधानी आहे. पण 10 वर्षांत दिल्लीमध्ये किती आंतरराष्ट्रीय कार्यक्रम झाले ? गांधीनगरमध्ये किती झाले ? अहमदाबादमध्ये किती झाले ? दिल्ली मध्ये आंतरराष्ट्रीय कार्यक्रम झाले नसून गुजरात मध्येच मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाले याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधानाचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असले पाहिजे. आता ते वसुलीचे कार्यालय झाले आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img